गणेश उत्‍सव २०२३ : श्री सद्गुरु बाळूमामांची आरती | पुढारी

गणेश उत्‍सव २०२३ : श्री सद्गुरु बाळूमामांची आरती

गणेश उत्‍सव २०२३ : लाडक्या गणरायांच्या आगमनाला आता फक्त 5 दिवस उरले आहेत. त्यासाठी घराघरात साफ-सफाई, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. गणपती बाप्पांसाठी वैशिष्ट्यपूर्ण देखावे करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या आहेत. लोकांनी आधीच गणेश मूर्ती आगाऊ पैसे देऊन बूक करून ठेवली आहे. तर गणपती सह गौरीचे आगमन करण्यासाठीचीही लगबग सुरू आहे. गौरी-गणपतींसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक मखरे आणण्यात आली आहे. तर मंडळांनी गणेश मूर्ती मंडळात आणून ठेवल्या आहेत. यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आली आहे. मंगळवारी अंगारक योगावर श्री गणेश स्थापना होणार आहे. गणपतीच्या आरतीसह श्री सद्गुरु बाळूमामांची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळातील पुजेत म्‍हटली जाते.

गणेश उत्‍सव २०२३ : श्री सद्गुरु बाळूमामांची आरती

घेऊन अवतार तारीयले जन
भजन भक्तीभावे केले पावन
उच्च नीच भाव न पहाता जाण
सकला समभावे केले पालन
जयदेव जयदेव जय सिध्द पुरूषा ॥१॥

जयदेव जयदेव जय सिध्द पुरूषा
आरती ओवाळीतो पुरवावी मनिषा ॥धृ॥

मुळे महाराज सद्गुरू प्रसिध्द
अनुग्रहे त्यांच्या झालासी सिध्द
बोलू जाता मुखे खरा होय शब्द
म्हणोनी नरनारी लागलासे छंद
जयदेव जयदेव जय सिध्द पुरूषा ॥२॥

जयदेव जयदेव जय सिध्द पुरूषा
आरती ओवाळीतो पुरवावी मनिषा ॥धृ॥

आदमापूर गावी देहावसान
श्रावण वद्य चतुर्थी तिथी नेम जाण
म्हणूनिया तेथे समाधी स्थान
उत्सव करिताती भाविक जन
जयदेव जयदेव जय सिध्द पुरूषा ॥३॥

जयदेव जयदेव जय सिध्द पुरूषा
आरती ओवाळीतो पुरवावी मनिषा ॥धृ॥

दर्शन कृपा मज कांहीच असेना
परी भक्तीभावे करितो वर्णना
ठाव द्यावा पायी मज रंका दीना
करितो विष्णूदास हेची प्रार्थना
जयदेव जयदेव जय सिध्द पुरूषा ॥४॥

जयदेव जयदेव जय सिध्द पुरूषा
आरती ओवाळीतो पुरवावी मनिषा ॥धृ॥

हेही वाचलंत का? 

Back to top button