बेळगाव : सीमावासीयांवरील अन्यायाविरूद्ध आवाज बनणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे

बेळगाव : सीमावासीयांवरील अन्यायाविरूद्ध आवाज बनणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकाने सीमावासी मराठी माणसांवर कितीही अन्याय केला तरी येथील शिवप्रेम आणि महाराष्ट्रात जाण्याची इच्छा कमी होणार नाही. यापुढे सीमावासीय मराठी जनतेवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध संसदेत आवाज होणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. खासदार डॉ. कोल्हे यांनी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आणि शिवगर्जना देऊन शिवजयंती साजरी केली. त्याबद्दल शनिवारी (दि. 19) रात्री बेळगावच्या शिवप्रेमींनी त्यांचा सत्कार केला.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. पण कर्नाटकात अडकलेल्या मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने निदर्शने करणार्‍या मराठी लोकांवर गुन्हे दाखल करणे, हा असा प्रकार देशाच्या इतिहासात प्रथमच होत आहे. त्या घटनेचा निषेध करावा तितका कमीच. त्यामुळेच सीमाभागातील मराठी माणसांच्या हृदयातील सल दूर करण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्याने बंगळुरात दाखल झालो. शिवरायांना दुग्धाभिषेक घातला आणि त्या ठिकाणीच शिवगर्जना केली.

बंगळुरात जाण्यापूर्वी मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती, त्या वेळी त्यांनी सीमाप्रश्न, येथील मराठी माणसांच्या समस्या यावर सविस्तर माहिती दिली. आज तुमचा प्रतिनिधी म्हणून मी शिवरायांना वंदन करून आलो आहे. यापुढे तुमच्यावर होणार्‍या प्रत्येक अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची जबाबदारी माझी आहे. बेळगावने मला सुरवातीपासूनच प्रेम दिले आहे. पण, आता सीमावासीयांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मध्यवर्ती समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात निदर्शने केल्यामुळे 38 मराठी युवकांना 47 दिवस कारागृहात डांबण्यात आले. अशा काळात डॉ. कोल्हे यांनी त्याच शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक घालून मराठी जनतेची इच्छा पूर्ण केली आहे. सीमाप्रश्‍नाच्या लढ्यात त्यांनी आमच्यासोबत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रमाकांत कोंडुसकर यांनी, आम्ही कारागृहात गेलो याची आम्हाला खंत नाही. पण, यापुढे अन्याय झाला तरी आम्ही थांबणार नाही. ज्या शिवरायांचे नाव घेवून कर्नाटकात निवडून आलेल्या आमदार, खासदारांना जे काम जमले नाही, ते काम खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आता आम्ही समाजासाठी एकवटलो असून आमची ताकद आता वाढली आहे, असे सांगितले.

यावेळी मध्यवर्ती समितीतर्फे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी खासदार डॉ. कोल्हे यांचा सत्कार करून सीमाप्रश्‍नी संसदेत आवाज उठवण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख, आदिल फरास, रोहित पाटील उपस्थित होते. पियूष हावळ यांनी सूत्रसंचालन केले. आर. आय. पाटील, दत्ता जाधव, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, विकास कलघटगी, चंद्रकांत कोंडुसकर, अमित देसाई, कपिल भोसले, सागर पाटील, प्रकाश कालकुंद्रीकर, आनंद आपटेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.

पेटून उठतो…तो मराठी मावळा!

अन्यायाविरोधात लढताना घाबरून जावून भिंतीला पाठ लावणारा नव्हे तर पेटून उठणारा मराठी मावळा असतो आणि असे मावळे संपूर्ण सीमाभागात आहे, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात आंदोलन केल्यामुळे कारागृहात जागृत स्वाभिमान जागवलेल्या 38 युवकांचे कौतुक केले.

हेही वाचलात का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news