धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील दहीवद शिवारात मासे घेवून जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. त्यानंतर मात्र नागरिकांनी श्रावणातही मासे उचलण्यासाठी एकच गर्दी केली. नागरिकांनी मिळेल त्यात टाकून मासे लुटून नेले. ट्रकला अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळील चोपडा फाट्यानजीक हा अपघात झाला. आयशर ट्रक (क्र . एमएच ४३ बीजी ६३ ९९) मासे घेवून मुंबई येथून इंदूरकडे (मध्य प्रदेश) जात होता.
त्या दरम्यान महामार्गावरील चोपडा फाट्यानजीक चालकाला गतिरोधक लक्षात न आल्याने भरधाव ट्रक उलटला. त्यामुळे ट्रकमधील मासे रस्त्यावर व शेतात पसरले. अपघात झाल्यावर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी चालकाला मदत केली.
तर काहींनी मासे पळविण्यास सुरूवात केली. नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात मासे गोळा करण्यासाठी गर्दी केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी गर्दी हटवत मदतकार्य सुरू केले.
अपघातग्रस्त आयशरला पुन्हा उचलून रस्त्यावर उभे केले. ट्रकमधील ताडपत्रीत पाणी भरून रस्त्यावर व शेतात पसलेले मासे त्यात भरण्यात आले. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही.