मोहरे; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालूक्यातील सातवे येथील शिवतेज ऊर्फ मोन्या विनायक घाटगे (वय – १८) महाविद्यालयीन युवकाचा प्रेम संबंधातून झालेल्या जबर मारहाणीत उपचारा दरम्यान सीपीआर येथे आज पहाटे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे सातवे गावात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. कोडोली पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिवतेज याचे गावातील एका तरुणीशी एक वर्षापूर्वी प्रेम संबंध निर्माण झाले होते. या प्रेम प्रकरणाला दोन्ही कुटुंबातून विरोध होता. सहा महिन्यापूर्वी कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंद असून ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून दोन्ही कुटुंबांच्या वतीने या प्रकरणावर गावपातळीवर तोडगा काढण्यात आला होता.
बुधवार दि. ८ सप्टेंबर रोजी शिवतेज कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे गेला होता.
तो सायंकाळी सातवे गावाकडे परत येत असताना शिराळा तालुक्यातील मांगले गावच्या हद्दीत आला असता त्याच्या मागावर असलेल्या पाच ते सात जणांनी त्याला अडवले.
धनटेकी नावाच्या शेतजमीन परिसरात नेऊन काठ्या, दगड, गजाच्या साहाय्याने त्याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.
यावेळी बच्चे सावर्डे ते मांगले (वारणा धरण ) रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी त्याची विचारपूस केली.
नातेवाईक व मित्रमंडळीच्या मदतीने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, असता आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शिवतेज हा वारणा महाविद्यालयामध्ये बारावीचे शिक्षण घेत असून त्याच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे. या घटनेमुळे सातवे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास शिराळा व कोडोली पोलिस करत आहे.