पुण्यातील मानाचा चौथा गणपती – श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ | पुढारी

पुण्यातील मानाचा चौथा गणपती - श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

कल्पक, नाविन्यपूर्ण आणि भव्य देखाव्यांसाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे.1901 साली लोकमान्य टिळक यांनी या सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापना केली. या स्थापनेमध्ये दातार कॉन्ट्रॅक्टर, कावरे आईस्क्रीमवाले, सदाशिवराव उर्फ बुवा पवार, आबा खटावकर, बंडोपंत ढवळे, हरिभाऊ रोटे, वामनराव ताम्हणकर, गणपतराव वनारसे, दिवेकर, खटावकर यांचाही सहभाग होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवात पोवाडे, मेळे आणि समाज जागरणाचे कार्यक्रम आयोजित केले जात असत. अनेक मान्यवर लोकांची भाषणे आणि लोकनाट्य देखील या गणपतीसमोर सादर करण्यात आलेली आहेत. थोर शास्त्रीय गायकांचे गायन देखील येथे झालेले आहेत. तुळशीबागेच्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी हा गणपती बसवला जातो.

1952 साली डी. एस. खटावकर यांनी मांडलेल्या संकल्पनेमधून मंडळाच्या उत्सवाला कलाटणी मिळाली. तुळशीबाग गणपती पुढे त्यांनी सजावटीच्या गणपतीची संकल्पना रुजवली. नौकावहन करणारा गणपती, काचेचा गणपती असे गणपतीचे विविध रूपे त्यांनी साकारली.

पुणे शहरातील गणेश उत्सवाला एक वेगळे स्वरूप देण्याचे कार्य केले ते खटावकर यांनी 1952 सालापासून गणेशोत्सवाची विविध रूपे लोकांसमोर मांडत असताना 1975 साली त्यांनी फायबर ग्लासच्या माध्यमातून कायमस्वरूपी अशी मंडळाची मूर्ती घडवली. ज्येष्ठ शिल्पकार कै. डी. एस. खटावकर यांनी फायबर ग्लासच्या माध्यमातून पहिल्यांदाच मंडळाची गणेश मूर्ती तयार केली.

त्यानंतर धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक देखाव्याना प्राधान्य देण्यात आला. 1975 साली मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष होते. त्यावेळी भव्य असा कैलास मंदिरचा देखावा तयार करण्यात आला होता. अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये गणेशोत्सवात धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे सादर करायची परंपरा मंडळाने खटावकर यांच्या माध्यमातून राबविली. त्यात अमृत मंथन, अहिरावण महिरावण, भीम धृतराष्ट भेट, हिरण्यकश्यप वध आदी देखावे खूप प्रसिद्ध झाले.

तीच परंपरा 2000 सालातील शताब्दी महोत्सवापर्यंत होती. कलामहर्षी कै.डी. एस. खटावकर यांच्या कलारुपी सेवेचा बहुमान म्हणून त्यांना मंडळाचे अध्यक्षपद दिले…एखादा कलाकार एखाद्या मंडळाचा अध्यक्ष होतो ही पहिलीच घटना होती. त्या शताब्दीमहोत्सवात शिल्पकार विवेक खटावकर यांनी भव्य सप्त मातृका देखावा सादर केला. 2000 सालानंतर मंडळात आमूलाग्र बदल झाला.

गणेशोत्सवात सजावटीसह सामाजिक कार्याला प्राधान्य देणे सुरू झाले. आज मंडळाच्या वतीने दरवर्षी निराधार मुलांना तुळशीबागेत खरेदीसाठी बोलावून त्यांना नवीन कपडे खरेदी करण्याचा आनंद दिला जातो.

मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस हा विविध संस्थेमध्ये त्यांना लागणार्‍या गरजेच्या वस्तू देऊन साजरा केला जातो.
मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांसह नैसर्गिक आपत्तीमध्ये मंडळ नेहमीच व्यापार्‍यांच्या सहकार्याने मदतीचा हात देतो. विसर्जन मिरवणूक संपन्न झाल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांचा कृतज्ञता सन्मान करण्यात येतो. पुणे शहरातील हा एकमेव चांदीचा गणपती म्हणून ओळखला जातो.

जवळजवळ 300 किलोची चांदीचे आभूषण या गणपतीवर आहेत.. मंडळाचा स्वतःचा एक मोठा इतिहास असून, तो मानाचा चौथा गणपती म्हणून महाराष्ट्रात आणि पुण्यात ओळखला जातो.

Back to top button