कोल्हापूर : हद्दवाढ नाकारून झालेल्या प्राधिकरणातून अपेक्षाभंग

कोल्हापूर : हद्दवाढ नाकारून झालेल्या प्राधिकरणातून अपेक्षाभंग

कोल्हापूर ; सतीश सरीकर : कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करायची की नाही, या वादात राज्य शासनाने कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय 16 ऑगस्ट 2017 रोजी घेतला. महापालिकेसह त्यास लागून असलेली 42 गावे (एमआयडीसी वगळून) या सर्वांचा समावेश असलेले कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र घोषित करण्यात आले.

प्राधिकरणातून विकासाची स्वप्ने दाखविण्यात आली. परंतु; प्राधिकरणाचे कामकाज सुरू झाल्यापासून आतापर्यंत अपेक्षाभंग झाल्याची स्थिती आहे. प्राधिकरणातील गावांची अवस्था दयनीय झाली आहे. बांधकाम परवानगीपासून इतर सेवांसाठी ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

हद्दवाढीचा प्रश्न 1990 पासून चर्चेत आहे. हद्दवाढ अभावी कोल्हापूरचा विकास रखडला आहे. शहर परिसरातील गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे. परिणामी शहर परिसरातील गावांसाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले.

प्राधिकरणात येणार्‍या गावांत प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा योजना, प्रशासकीय इमारती, उद्याने, खेळासाठी मैदाने, भाजी मार्केट आदींसह पहिल्या टप्प्यात तब्बल दोन हजार हेक्टर जागेत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार होत्या. परंतु; अद्याप त्यातील एकही सुविधा झालेली नाही.

प्राधिकरणांतर्गत संपादित जमीन ताब्यात घेऊन मूळ विकास योजना व विविध पेठांचे नकाशे तयार करणे. विविध प्रयोजनांच्या (निवासी, व्यापारी, औद्योगिक) भूखंडाची भाडेपट्टी ठरविणे, भूखंडांवर केलेल्या बांधकामाबाबतचे नकाशे, बांधकाम परवाना, बोगवटा प्रमाणपत्र, भूखंडाच्या मोजणीचे अभिलेख तसेच प्राधिकरणाच्या ताब्यात मिळालेल्या जमिनीचे संयुक्त मोजणीपत्रक तयार करणे आदी पहिल्या टप्प्यातील कामे केली जाणार होती.

प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्षेत्रातील विकासकामांसाठी आराखडा तयार करणे, नकाशे तयार करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे आदींसाठी 10 कोटी निधीची मागणी केली होती. परंतु; त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. प्राधिकरणांतर्गत विविध पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, भरती केलेली नाही. परिणामी प्राधिकरणाचे काम रखडत आहे.

प्राधिकरणातील गावे

कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र करवीर तालुक्यातील मौजे शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, वळिवडे, गांधीनगरसह चिंचवाड, मुडशिंगी, सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव (एमआयडीसी क्षेत्र वगळून), कणेरी, कंदलगाव, पाचगाव, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, सादळे, मादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगील खुर्द, कसबा करवीर (भाग), उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र, हातकणंगले तालुक्यातील मौजे टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली (एमआयडीसी क्षेत्र वगळून) आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news