पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : पैठण तालुक्यात मंगळवारी पहाटेपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नाथसागर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून गोदावरी नदीवरील बंधारे पूर्ण भरले आहेत. या बंधाऱ्यातून कुठल्या क्षणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे.
या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तळ्याचे स्वरूप निर्माण झाले. पैठण शहरांमध्ये नेहमीप्रमाणे व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी घुसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. पाचोड व बिडकीन परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाल्याची माहिती 'दैनिक पुढारी'शी बोलताना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
मंगळवारी रात्री पैठण तालुक्यात विहामांडवा १२, लोहगाव ५, पाचोड ३०, आडुळह १६, नांदर २२, बालानगर ८, ढोरकीन ८, बिडकीन २९, पिंपळवाडी पिं. १२, पैठण १५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत तालुक्यात एकूण ४५९३ मिमी पाऊस पडलेला आहे.
सोमवारी सायंकाळपासून मोठ्या प्रमाणात नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस बरसत आहे. धरणाच्या खालील भागात मंगळवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे ग्रामीण भागातील नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहे. हे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेताला तळ्याचं स्वरूप निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात दमदार पाऊस पडत असल्याने येथील नाथसागर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून मंगळवारी सकाळी धरणाच्या नियंत्रण कक्षातून २ हजार ४१३ क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. सध्या या धरणात ४२.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?