पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले. अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार इतकी धनराशी मिळाली तसेच ट्रॉफीही त्याने आपल्या नावे केली. खेळाडूवृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि तो या पर्वाचा विजेता ठरला. तुम्हाला माहितीये का, अक्षय केळकर रिक्षावाल्याचा मुलगा आहे. (Akshay Kelkar)
अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालवतात. तो बिग बॉसच्या सेटवर येतानाही वडिलांच्या रिक्षातून आला होता. आई-वडील दोघेही प्रचंड मेहनत घेतात. अक्षयने 'शून्यातून विश्व निर्माण केलं..' असं म्हणायला हरकत नाही.
कलर्स मराठीवरील 'निमा डेंगझोपा' या प्रसिद्ध हिंदी मालिकेतून अक्षय केळकरला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत त्याने सुरेश नावाचे पात्र साकारले होते. ही मालिका एक वर्ष चालली. या मालिकेत मराठी अभिनेत्री सुरभि दास देखील मुख्य भूमिकेत होती.
अक्षयने २०१३ मध्ये 'बे दुने दहा' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पुढे 'कमला' मालिकेत त्याने उदय देशपांडेची भूमिका साकारली होती. तो 'क्राइम पेट्रोल,' 'भाखरवडी' या मालिकेतही तो दिसला. मालिकेसोबतच तो चित्रपटाही दिसला. अक्षयने 'प्रेमसाथी' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. अवधूत गुप्तेच्या 'कान्हा' या चित्रपटात, 'कॉलेज कॅफे', 'टकाटक २', 'डॉन कटिंग २', 'माधुरी' हा चित्रपटातही तो झळकला. यासोबतच अक्षयने काही शॉर्ट फिल्म्समध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
अक्षयचा जन्म ठाण्यात झालाय. बालपणापासून त्याला आर्ट डायरेक्टर व्हायचं होतं. यामध्ये त्याने आपले करिअर केलं आणि तो यशस्वी ठरला. अक्षय केळकर सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह राहतो. इन्स्टाग्रामवर १ लाखांहून अधिक लोक त्याला फॉलो करतात.