कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'अपघातग्रस्तांना मदत हे माझे कर्तव्य, माझा देश अपघातमुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी… हेल्मेट व सीटबेल्ट वापराचे अनुकरण करेन', अशी शपथ घेत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध वाहतूक नियम पालनाचे महत्त्व जाणून घेतले. निमित्त होते दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनाचे.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहकार्याने प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूल येथे 'शिस्तबद्ध वाहतूक व आपली जबाबदारी' या विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, पुराभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके प्रमुख उपस्थित होते. यावेळी गिरी म्हणाल्या, शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जाणीव झाली पाहिजे. अल्पवयीन मुलांना वाहने देण्याकडे पालकांचा कल दिसतो आहे. हा गंभीर गुन्हा आहे. याप्रकरणी पालकांवर न्यायालयात खटला दाखल करण्याची तरतूद आहे. दरम्यान, प्रथम सत्रात 'इंदुमती राणीसाहेबांचे कार्य' या विषयावर खोडके यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण त्यांच्या पश्चात सुरू ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य इंदुमती राणीसाहेबांनी केले. यामधील एक प्रतीक म्हणजे सध्याचे इंदुमतीदेवी हायस्कूल आहे. त्यांनी स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी ललित विहार संस्था स्थापन केली. संस्थेमध्ये शैक्षणिक सुविधेसह औद्योगिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात होते.
उपक्रमाचा समारोप वाहतूक नियम जागृतीविषयक पथनाट्याने झाला. विवेकानंद कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आदिती पाटील, ओम पाटील, वैष्णवी जाधव, श्रेया गुरव, गणेश भिसे, सुयश झुणके, संदीप पाटील, श्रेयस धोत्रे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी मुख्याध्यापिका शैलजा भोसले, पर्यवेक्षिका वर्षा पाटील, साधना पोवार, पल्लवी जाधव, वाहतूक शाखेचे राकेश मछले, संतराम रेडेकर, सुनील गोरे, शिवाजी गोणी उपस्थित होते. प्रास्ताविक विक्रम रेपे यांनी केले. सूत्रसंचालन रुचिरा रूईकर यांनी केले. सीमा सूर्यवंशी यांनी आभार मानले.