तेहरान; वृत्तसंस्था : इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाची धग अजूनही शमायला तयार नाही. आता तेथे तीन सुरक्षा कर्मचार्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून आणखी तिघा आंदोलकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा आणि सुरक्षा कर्मचार्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याचा ठपका या तिघांवर इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने ठेवला आहे. त्यामुळे इराणमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्यांची संख्या सतरावर पोहोचली आहे. त्यातील चौघांना फासावर चढवण्यात आले असून, अन्य आंदोलकांना दिल्या जाणार्या शिक्षेची कार्यवाही बाकी आहे. सरकारने कितीही अटकाव केला; तरी गेल्या तीन महिन्यांपासून इराणमध्ये सुरू असलेले हिजाबविरोधी आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे.