पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाळा आणि कॉलेज सीबीएसई बोर्डाशी संलग्न करण्यासाठी बनावट ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात आता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षणाधिकारी सुनंदा तुकाराम वाखारे ( 43, पार्क सोसायटी, गणपती चौकाजवळ, विमाननगर) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार 14 जुलै 2022 पूर्वी जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा वापर केल्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सुनंदा वाखारे या शिक्षणाधिकारी असून, जुलै 2022 च्या पूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणार्या क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचालित पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, एम पी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (शिवाजीनगर) व एज्युकेशनल करिअर फाउंडेशन नमो आर आय एम एस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या शाळा आणि कॉलेजला सीबीएसई बोर्डाची संलग्न करण्याबाबतचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी केलेल्या चौकशीत उघड झाला आहे. प्राथमिक तपासामध्ये या शाळांची नावे उघड झाली असून, आणखी काही शाळांचा सहभाग असण्याचीदेखील शक्यता आता वर्तवली जात आहे. समर्थ पोलिस तपास करीत आहेत.
काय आहे प्रकरण…
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जुलै 2022 मध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आपल्या परिसरातील बनावट ना -हरकत प्रमाणपत्र घेणार्या सीबीएसई शाळांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उपसंचालकांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकार्यांना बनावट ना-हरकत प्रमाणपत्र मिळवणार्या शाळांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकार्यांनी याबाबत चौकशी केली. त्यात त्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या शाळांव्यतिरिक्त आणखी काही शाळांनी बनावट प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले. शाळांनी यामधील व्यक्तींना तब्बल बारा लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.