पुढारी ऑनलाईन : गेल्या आठवड्यापासून देशभरासह राज्यभरातही थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे. पुढच्या काही दिवसात देशात विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पारा घरसरून थंडी वाढणार (Weather warning) असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि कोकण किनारपट्टीलाही कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वातावरण कोरडे असून, पुढील काही दिवस या ठिकाणी कडाक्याची थंडी (Weather warning) पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. काल विदर्भातील अमरावती (10.8°C), यवतमाळ (11.05°C) आणि नागपूर(11.06 °C) या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. हीच परिस्थिती पुढील पाच दिवस राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
राज्यातील महत्त्वाच्या शहरे नाशिक (10.4°C), पूणे (11.03), औरंगाबाद (11.1°C), कोल्हापूर (16.04°C), नांदेड(14°C), जळगाव (13°C), अहमदनगर (13.08°C) या ठिकाणीही कमी तापमानाची (Weather warning) नोंद झाली असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.