पुणे : दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री थंडीचा कडाका | पुढारी

पुणे : दिवसा उन्हाचा तडाखा, रात्री थंडीचा कडाका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिवसा कमाल तापमान 35 अंशांवर गेल्याने दिवसभर उकाडा जाणवतोय. मात्र, रात्र होताच किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका जाणवत आहे. कमाल व किमान तापमानातील मोठ्या फरकामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सोमवारी रत्नागिरीचे कमाल तापमान 35.8 अंश, तर औरंगाबाचे किमान तापमान 12.8 अंशांवर गेले होते.

राज्यात सर्वत्र कमाल व किमान तापमानात मोठी तफावत निर्माण झाल्याने दिवसा उन्हाचा जबर चटका, तर रात्री थंडीचा कडाका, असे विषम हवामान तयार झाल्याने नागरिक हैराण झाले असून, आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. बहुतांश भागात ढगाळ वातावरण असल्याने दुपारी त्या भागात जास्तच उकाडा जाणवत आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असला, तराही दक्षिण भारतात पाऊस सुरू आहे. कारण बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर झाल्याने दिवसा कडक उन्ह, तर रात्री थंडी, असे वातावरण आहे. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका जास्तच जाणवत आहे.

कमाल तापमानाचा उच्चांक..
राज्यातील बहुतांश शहरांचे सरासरी कमाल तापमान 32 अंशांवर, तर रात्रीचे किमान तापमान 13 अंशांवर आहे. हिवाळ्यात कमाल व किमान तापमानात प्रथमच इतका फरक दिसत आहे. याचे कारण महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढलेले आहे. राज्यात रत्नागिरी जिल्ह्याचे कमाल तापमान उन्हाळ्यासारखे 35.8 अंशांवर गेले होते. तर, औरंगाबाद शहराचे किमान तापमान 12.8 अंशांवर गेले. किमान व कमाल तापमानात मोठा फारक निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसत आहे.

सोमवारचे कमाल तापमान
-रत्नागिरी 35.8, अलिबाग 32.5, मुंबई 33.8, सांताक्रूझ 34.7, नांदेड 33.6, पुणे 31.7, जळगाव 32, कोल्हापूर 31.6, महाबळेश्वर 25.6, नाशिक 31.1, सातारा 30.8, सोलापूर 33.3, औरंगाबाद 30.4, परभणी 31.7, अकोला 32.3, चंद्रपूर 29.6, नागपूर 30.1, वाशिम 32.8.

किमान तापमान
औरंगाबाद 12.8, पुणे 13.9, नगर 16.1, जळगाव 16.3 कोल्हापूर 21.1, महाबळेश्वर 16, मालेगाव 17, नाशिक 15, सांगली 19.1, सातारा 16.4, सोलापूर 19.4, मुंबई 23.8, रत्नागिरी 24, उस्मानाबाद 19, परभणी 15.5, नांदेड 16.8, अकोला 17, अमरावती 14.8, चंद्रपूर 13.8, गोंदिया 13, नागपूर 17.

 

Back to top button