पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सर्वच भागांत विशेषत: विदर्भात थंडी पुन्हा वाढली आहे. मंगळवारी गोंदियाचे तापमान राज्यात सर्वात नीचांकी म्हणजेच 11.5 अंश सेल्सिअस एवढे खाली घसरले आहे. सरासरीपेक्षा उणे 5.2 अंशांनी पारा घसरला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र, सोमवारपासून ढगाळ वातावरण हळूहळू कमी होऊन आकाश निरभ्र होऊ लागले. त्यातच दक्षिण भारताकडून राज्याकडे येणारे बाष्पयुक्त वारेदेखील कमी झाले.
परिणामी, उत्तर भारताकडून राज्याकडे येणार्या थंड वार्यांचा वेग वाढला. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडी सुरू झाली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. त्यातच पश्चिमी चक्रवात हिमालयीन भागात पुन्हा सक्रिय झाला आहे, यामुळे ईशान्य भारतातील सर्व राज्ये तसेच मध्य प्रदेशच्या बहुतांश भागांत थंडीचा कहर वाढला असून, किमान तापमानाचा पारा 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरला आहे.
राज्यात मंगळवारी पुन्हा थंडी वाढू लागली आहे. पुढील दोन दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान शहरांचा पारा सरासरीपेक्षा जास्त आहे, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, औरंगाबाद या शहरांचा किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. कोकणातील अलिबाग, डहाणू या जिल्ह्यांच्या सरासरी तापमानात थोडीशी घट झाली आहे. निरभ्र आकाश तसेच उत्तर भारत आणि मध्य प्रदेशकडून येणारे थंड वारे यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात विशेषत: विदर्भात थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.