ऐकावं ते नवलच! गुलाबी थंडीत गावकऱ्यांना आंघोळीसाठी 'हे' गाव देणार मोफत गरम पाणी | पुढारी

ऐकावं ते नवलच! गुलाबी थंडीत गावकऱ्यांना आंघोळीसाठी 'हे' गाव देणार मोफत गरम पाणी

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. आंघोळीच्या गरम पाण्यासाठी गावकरी जंगलात जाऊन वृक्षतोड करत आहेत. त्यातून जंगलाची हानी तर होतेच शिवाय मानव-वन्यजीव संघर्षाचीही भीती असते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि धूर विरहित गावासाठी भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार या गावाने गावकऱ्यांना गरम पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

भाऊबिजेपासून सुरू झालेला हा उपक्रम आता अविरत सुरू राहणार आहे. या उपक्रमामुळे या गावाची चर्चा आता राज्यभरात होत आहे. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी या गावाची लोकसंख्या १ हजार ८७९ आहे. तर १२० कुटुंब येथे राहतात. हिवाळ्यात गरम पाण्यासाठी येथील गावकरी जंगलात जाऊन वृक्षतोड करतात. सध्या भंडारा जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला आहे. याशिवाय लाकडे तोडण्यासाठी गावकऱ्यांची श्रम आणि वेळ वाया जात आहे.

ही बाब लक्षात घेऊन सरपंच मनोहर बोरकर यांनी गावकऱ्यांना मोफत गरम पाणी देण्याची योजना सुचवली. ग्रामपंचायतीचे सचिव हेमकृष्ण लंजे यांनीही या उपक्रमाला दुजोरा दिला. त्यानंतर झालेल्या ग्रामसभेत हा विषय मांडण्यात आला. गरम पाणी मोफत मिळणार असल्याने या ठरावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली. त्यानंतर सरपंच मनोहर बोरकर यांच्या पुढाकाराने सोलर वॉटर हिटर सयंत्र लावण्यात आले आहे. त्यासाठी २ लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती हेमकृष्ण लंजे यांनी दिली.

दीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे आहे. सोलर पॅनलद्वारे पाणी गरम होते. भाऊबिजेपासून सकाळी ६ पासून गावातील १२० कुटुंबाना गरम पाणी मोफत दिले जाते. गरम पाण्यासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी होत असते. यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही. घरपट्टी व पाणीपट्टी करातून याचा खर्च भागविला जात आहे. या उपक्रमामुळे गावकरी सुखावले आहेत. त्यांना आता जंगलातील लाकडांवर अवलंबून राहावे लागत नाही. तसेच जंगलातील वृक्षतोड करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा आता सदुपयोगसुद्धा होऊ लागला आहे.

नाविण्यपूर्ण उपक्रमात अग्रेसर

रेंगेपार ग्रामपंचायत विविध नाविण्यपूर्ण उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. या ग्रामपंचायतीला २०११ मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे राज्यातून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. यासह लहान मोठे अनेक पुरस्कार या ग्रामपंचायतीने पटकाविले आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या १०० एकर परिसरात वृक्ष लागवड केली आहे.

गावातील वातावरण शुद्ध आणि पर्यावरणीय राहण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यातून गावकऱ्यांचा जंगलावरील भार कमी झालेला आहे. वनसंवर्धन होत आहे. हा उपक्रम अवितरपणे सुरू राहणार आहे.
– हेमकृष्ण लंजे, सचिव ग्रामपंचायत, रेंगेपार

हेही वाचलंत का ? 

Back to top button