उत्तर भारतात थंडीचा कडाका, दिल्लीचा पारा १० अंश सेल्सियसच्या खाली | पुढारी

उत्तर भारतात थंडीचा कडाका, दिल्लीचा पारा १० अंश सेल्सियसच्या खाली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा पारा घसरु लागला असून शुक्रवारी राजधानीतील तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली नोंदविले गेले. केवळ सकाळीच नव्हे, तर संध्याकाळी देखील थंडीचा कडाका वाढला आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वेटर्स, शाल तसेच गरम कपडे काढण्यास सुरुवात केली आहे.

दिल्लीतील सफदरजंग हवामान केंद्रावर शुक्रवारी सकाळी ९.६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले. थंडीच्या मोसमातला आतापर्यंतचा हा सर्वात निचांकी स्तर आहे. येत्या काही दिवसांत तापमान झपाट्याने कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दिल्लीतील कमाल तापमान २६ ते २८ अंशाच्या आसपास स्थिर आहे. शहराच्या काही भागात सकाळच्या वेळी धुके दिसू लागले आहे.

खासगी हवामान संस्था स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी विक्षोभ पूर्वेकडील बाजूला वाढत आहे. यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या काही भागात थंड हवा वेगाने वाहत आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंड हवा कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्लीतील प्रदुषणात पुन्हा एकदा वाढ झाली असून वायू गुणवत्ता निर्देशांक तीनशेच्या आसपास पोहोचला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button