नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी निवडणुकांमध्ये आघाडीचे अधिकार स्थानिकस्तरावर दिले जाण्याची शक्यता असून, कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होऊ शकतात. भाजपचा अजेंडा हा निवडणुका, सत्ता, पैसा आणि पुन्हा निवडणुका असा आहे. त्यामुळे गाफिल न राहता निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले. कारणे न देता जनतेमध्ये जाऊन पक्षाबद्दल वातावरण निर्मिती करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनमध्ये सोमवारी (दि.2) उपमुख्यमंत्री पवार यांनी शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिक कोकाटे, दिलीप बनकर, सरोज अहिरे, नितीन पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे शिवसेना व काँग्रेसच्या मंत्र्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण राष्ट्रवादीशी निगडित खात्यांच्या मंत्र्यांना जाब विचारू शकतो, असे सांगताना नाशिकला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही पवारांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेची जबाबदारी तुमचीच…
एकेकाळी राज्यात सर्वाधिक पीककर्ज देणारी बँक म्हणून नाशिक जिल्हा बँकेचा लौकिक होता. पण गेल्या काही वर्षांत बँकेला घरघर लागल्याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील बँकेला 600 कोटींचा नफा झाला असून, पुणे जिल्हा बँकही सुस्थितीत असल्याचा दाखला देत आपली बँक वाचविण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे पवार म्हणाले.