नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुरस्कारप्राप्त शेतकर्यांनी चांगले काम केल्यामुळे त्यांचा राज्य सरकारकडून सन्मान होत आहे. त्यांनी आजूबाजूच्या शेतकर्यांना पुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, हे खरे पुण्याचे काम आहे. कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने देशात अग्रेसर व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
कोश्यारी यांच्या हस्ते राज्यातील 2017, 2018 व 2019 या वर्षांतील कृषी पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरद़ृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.
राज्यभरातून आलेल्या 297 शेतकर्यांना पुरस्कार करण्यात आले. राज्यपालांनी नाशिकमधील शेती व शेतकर्यांचे तोंडभरून करतानाच, आपण उत्तराखंडमधील शेतकर्यांना महाराष्ट्रात बोलावून हे प्रयोग बघण्यास सांगत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, केंद्र व राज्यात सरकार कोणाचेही असो, सरकारे येतील आणि जातील. पण, त्यांनी शेतकर्यांच्या भल्यासाठी काम करावे. एकेकाळी आपण पोटभर अन्नधान्य पिकवू शकत नव्हतो. पण, आता आपण अनेक देशांना धान्य निर्यात करीत आहोत, हे केवळ शेतकर्यांच्या मेहनतीमुळे शक्य झाले. देश सैनिक व शेतकरी यांचे ऋण विसरू शकत नाही. यावेळी राज्यपालांनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आभार मानले. यावेळी आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.
खतटंचाई जाणवार नाही : भुसे
कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यांनी कृषी विभागाच्या अनेक योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, या खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला 45 लाख टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, काळाबाजार करणार्या खत विक्रेत्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहे. यामुळे या हंगामात खतांची टंचाई जाणवणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
ई-पीक नोंदणी करा : थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी महसूल विभागाकडून शेतकर्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देतानाच ई-पीक पाहणी या अॅपमध्ये शेतात घेतलेल्या पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन केले. या ई-पीक पाहणी अॅपमुळे सरकारला राज्यातील शेतकर्यांनी कोणती पिके घेतली आहे, याबाबत दैनंदिन माहिती मिळते. त्याचा उपयोग कृषिमालाच्या नियोजनासाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
'इथेनॉलवर भर द्या'
राज्यातील ऊसशेतीचा गौरव करताना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यासपीठावरील नेत्यांकडे हात करीत म्हणाले, हे नेते गोड गोड ऊस खाऊन मोठे झाले आहेत. आता या उसापासून साखरेप्रमाणेच इथेनॉल तयार करण्याची गरज असून, त्यामुळे साखर कारखानदारांबरोबरच शेतकर्यांचाही फायदा होईल, असे सांगितले.