…तेव्हा टिळक 13 वर्षांचे होते : ना. भुजबळांकडून राज ठाकरे यांच्या इतिहासाची चिरफाड | पुढारी

...तेव्हा टिळक 13 वर्षांचे होते : ना. भुजबळांकडून राज ठाकरे यांच्या इतिहासाची चिरफाड

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शंभूराजेंनी बांधली. महात्मा फुले यांनी महाराजांची समाधी शोधली. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हे धादांत खोटे आहे. फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगत, राज ठाकरे यांच्या इतिहासाची चिरफाड केली. टिळकांनी शिवस्मारकासाठी केवळ फंड गोळा केला. मात्र, पुढे काहीच केले नाही. पुढे विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता ती बँकच बुडाली, असे सांगण्यात आले, असा दावाही भुजबळ यांनी केला आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठात कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ना. भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकमान्य टिळक, रामदासस्वामी यांचे गुणगाण गायचे आणि शरद पवार यांना जातीयवादी ठरवायचे यासाठी ही सभा होती की काय, असे वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली हे धादांत खोटे आहे. त्यांनी इतिहास तपासून पाहावा. महाराजांची समाधी छत्रपती शंभू महाराजांनी बांधली. 1690 ते 1773 या काळात किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

1773 ते 1818 पर्यंत समाधीचा उल्लेख कुठेही सापडत नाही. किंबहुना पेशव्यांनीदेखील समाधीकडे दुर्लक्ष केले, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. महात्मा फुलेंनी 1869 मध्ये समाधी शोधली. पहिली शिवजयंती फुले यांनी साजरी केली. टिळकांनी समाधी आणखी चांगली बांधावी याकरिता शिवाजी महाराज रायगड मंडळ फंड काढला, पण उभ्या हयातीत टिळकांनी काहीही काम केले नाही. 1926 इंग्रज अधिकार्‍यांनी या स्मारक समितीकडे निधीबाबत विचारणा केली तेव्हा, ज्या बँकेत पैसे ठेवले ती बँकच बुडाली होती, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button