Stress-Relieving : तणाव घटवणारी उन्मनी मुद्रा

Stress-Relieving : तणाव घटवणारी उन्मनी मुद्रा

Stress-Relieving : धावपळ आणि तणावग्रस्त आयुष्य हे परवलीचे शब्द झाले आहेत. जीवनशैलीतील या बदलांमुळे आयुष्यात तणावाचा शिरकावही होतो आहे. निरीक्षण केल्यास आजूबाजूला असे अनेक तणावग्रस्त लोक आपल्याला सहज दिसतात. किंबहुना, ताणाच्या फेर्‍यात आपणही अडकतो. हाच तणाव दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी योगाभ्यासात काही मुद्राही केल्या जातात. तणाव निवारणासाठीही एक मुद्रा आहे, ती म्हणजे उन्मनी मुद्रा.

संबंधित बातम्या :

'उन्मनी' या शब्दाचा अर्थ विचार न करणे. या मुद्रेचा थेट परिणाम होतो तो मेंदूवर. त्यामुळे मन, मनातील विचार, विचारातून येणारा तणाव आदी विकारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. मानसिक तसेच संपूर्ण शांतता मिळू शकते. आयुष्यात सर्वच प्रकारच्या आनंदाचा अनुभव येतो. उच्च रक्तदाब, चक्कर येणे आदी त्रासांपासून मुक्ती मिळते. झोपही शांत लागते. एक प्रकारे ताणातून बाहेर पडल्याची स्थिती प्राप्त होते आणि एकाग्रतेवर केंद्रित होऊन सहजपणे ध्यानधारणा करता येते. (Stress-Relieving)

ही मुद्रा करण्यासाठी स्थिर आसनामध्ये बसून मणका ताठ असावा. डोळे पूर्ण उघडावेत, दीर्घ श्वास घ्यावा. काही क्षण थांबून सजगतेने डोक्याच्या मागच्या भागाच्या मेंदूवर लक्ष केंद्रित करावे. सजगतेने श्वासाबरोबरच मणक्यानजीक असलेल्या विविध चक्रांकडे लक्ष देत खाली जावे. ऊर्जा मूलाधार चक्रापर्यंत पोहोचेपर्यंत डोळे हळूहळू बंद करावेत.

दुसरी पद्धत : डोळे अर्धे बंद आणि अर्धे उघडे ठेवून लक्ष नाकाच्या टोकाकडे किंवा भुवईकडे ठेवून श्वास घ्यावा आणि मन शांत ठेवावे. डोळे अत्यंत संवेदनशील असता, त्यामुळे शेवटच्या स्थितीत फार वेळ राहू नये. ग्लुकोमा, डायबेटिक रेटिनापॅथी, मोतीबिंदू किंवा डोळ्यांची इतर कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा सल्ल्याशिवाय या मुद्रेचा सराव करू नये. (Stress-Relieving)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news