पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्न या शब्द उच्चाराला की, या पाठाेपाठ वधू आणि वर हे शब्द येतातच. ही गोष्ट दोघांच्या नवआयुष्याची असते;पण कोणी स्वत:शीच लग्न ( Sologamy ) करणार आहे, असं म्हटलं तरी नक्कीच तुमच्या भुवयां उंचावतील. मात्र तसं घडतंय. गुजरातमधील २४ वर्षीय तरुणी स्वत:शीच लग्न करणार आहे. हा विवाह सोहळा ११ जून रोजी होणार आहे. गुजरातमधील किंवा किंबहुना देशातील हे पहिलं 'स्व-लग्न' आहे, असा तिने म्हटलं आहे.
क्षमा बिंदू ही २४ वर्षीय तरुणी 'स्व-लग्न' करत स्वत:शी एकरुप होणार आहे. विशेष म्हणजे, सर्वसाधारण लग्नात होणारे सर्व विधी या लग्न साेहळ्यात पूर्ण केले जातील. फक्त वरात निघणार नाही.
या अनोख्या लग्नाबाबत क्षमा बिंदू हिने 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बाेलताना सांगितले की, "मला कधीच लग्न करायचे नव्हते; परंतू नववधू होणे हे माझं स्वप्न होतं. त्यामुळे मी स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. देशात यापूर्वी असं कोणी केलं आहे का? याचा मी गुगलवर शोध घेतला;पण मला तरी कोणीही स्वत:शीच लग्न केल्याचे उदाहरण आढळलं नाही. मी या देशातील स्वत:च्या प्रेमात पडून स्वत:शीच लग्न करणारी एकमेव तरुणी असेन."
'स्व-लग्न' म्हणजे स्वत:वर विनाअट प्रेम करणे. तुम्ही स्वत:ला आहे तसे स्वीकारणे आहे. भिन्न व्यक्तींवर प्रेम करुन लग्न केले जाते. मी स्वत:च्याच प्रेमात पडली असल्याने मी माझ्याशी लग्न करत आहे, असेही क्षमाने स्पष्ट केले आहे.
काही जणांना वाटेल स्व-लग्न ही संकल्पनाच असंबद्ध आणि मुर्खाची आहे;पण मला वाटतं की, कोणाशी लग्न करावे याचा अधिकार महिलांना असावा. यासाठी मी सर्वांना याची माहिती देत आहे. मला माझ्या आई-वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. ते खुल्या विचाराचे आहेत. त्यांच्या मला आशीर्वाद आहे, असेही क्षमाने म्हटलं आहे.
क्षमाचे स्वत:शी होणारे लग्न हे गोत्री मंदिरात होणार आहे. आता सर्वांचा कडेलोट म्हणजे तिने हनिमूनसाठी गोव्याला जाण्याचे नियोजन केले आहे. आता एवढं विचारु नका की, स्वत:शी लग्न केल्याबरोबर हनीमुनला कसे जाणार? कारण या प्रश्नाचे उत्तर केवळ क्षमाकडेच आहे.
हेही वाचा