शरद पवार पीएम मोदींच्या भेटीला ! राज्यात सुरु असलेल्या ‘ईडी डाव’वर चर्चा ?

शरद पवार पीएम मोदींच्या भेटीला ! राज्यात सुरु असलेल्या ‘ईडी डाव’वर चर्चा ?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ही भेट पंतप्रधान कार्यालयात तब्बल २० ते २५ मिनिटे झाल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या ईडीचा डाव सुरु असल्याने त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती की काल संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा त्याला संदर्भ होता याबाबतच माहिती मिळालेली नाही.

दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादीचे दोन नेते जेलमध्ये आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडी कमालीची सक्रीय झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांमध्येच धास्ती पसरली आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने ईडीचा उल्लेख होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, तर आगामी काही दिवसांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जेलमध्ये असतील असे थेट वक्तव्य केले आहे.

त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट होत आहे का याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे या भेटीनंतर राज्यात राजकीय धुरळा उडाला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवर भाष्य करताना राष्ट्रवादी आणि भाजपची एवढी कटूता नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी भेटीवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांचे मत वैयक्तिक असल्याचे सांगितले.

शरद पवारांच्या स्नेहभोज कार्यक्रमात नितीन गडकरी यांची उपस्थिती

देशातील राजकारणातील तीन दिग्गज नेते मंगळवारी संध्याकाळी एकाच ठिकाणी एकत्रित आले. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोज कार्यक्रमाला हजेरी लावली.दोन दिवसीय संसदीय कार्यप्रणाली संदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेसाठी राज्यातील आमदार राजधानीत आहेत.
यानिमित्त पवारांकडून सर्वपक्षीय आमदारांसाठी स्नेहभोज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील या कार्यक्रमाकरीता पवारांकडून आमंत्रित करण्यात आले होते.विशेष म्हणजे मुंबईतील मालमत्ते वर ईडी कडून करण्यात आलेल्या कारवाई नंतर संजय राऊत पहिल्यांदाच शरद पवार यांच्या घरी पोहोचले होते.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी च्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच आमदार अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे,संग्राम थोपटे उपस्थित होते.
हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news