Sanjay Raut : शरद पवारांचे जेवणाचे आमंत्रण, संजय राऊत बोलण्यासाठी माइक घेताच भाजप नेते निघून गेले | पुढारी

Sanjay Raut : शरद पवारांचे जेवणाचे आमंत्रण, संजय राऊत बोलण्यासाठी माइक घेताच भाजप नेते निघून गेले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तांवर काल ईडीकडून कारवाई करण्यात आली. जवळजवळ ११.५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मुंबईतील मालमत्तेवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाई नंतर संजय राऊत पहिल्यांदाच शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. (sanjay raut)

दोन दिवसीय संसदीय कार्यप्रणाली संदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेसाठी राज्यातील आमदार राजधानीत आहेत. या निमित्ताने शरद पवार यांच्या कार्यक्रमाला राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशाच्या राजकारणातील तीन दिग्गज नेते एकाच ठिकाणी आले होते.

Sanjay Raut : माइक हातात येताच भाजप नेते निघून गेले

दरम्यान या कार्यक्रमास नितीन गडकरी यांनी थोडा उशिर केल्याने सर्व भाजप आमदार गडकरी येईपर्यंत थांबले होते. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील यांच्यासह शरद पवार यांनी आमदार आणि खासदारांना संबोधित केले. यांच्यानंतर संजय राऊत यांच्या हातात माइक येताच भाजपचे सर्वच आमदार खुर्चीवरून उठून निघून गेले.

यापाठीमागचे नेमके कारण काय समजले नाही. राऊत ईडी कारवाईवरून भाजपवर टीका करतील यामुळे भाजपचे आमदार निघून गेल्याची चर्चा होती. याचबरोबर मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरीही स्नेहभोजनाचे आमंत्रण असल्याने आमदार तिकडे गेल्याचे बोलले जात होते.

या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच आमदार अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे,संग्राम थोपटे उपस्थित होते.

Back to top button