

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात १ हजार ८६ कोरोनाबाधित आढळले. तर, ७१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान १ हजार १९८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली.देशातील ४ कोटी २४ लाख ९७ हजार ५६७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर (corona) मात मिळवली आहे. तर, ५ लाख २१ हजार ४८७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
देशात केवळ ०.०३% म्हणजेच ११ हजार ८७१ सक्रिय कोरोनाबाधित (corona) आहेत. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६% नोंदवण्यात आला.तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.२३% नोंदण्यात आला. गेल्या दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या १ हजारांहून खाली आली होती. १ एप्रिल रोजी १ हजार २६०, २ एप्रिल १,०९६, ३ एप्रिल ९१३ आणि ४ एप्रिल ला ७९५ कोरोनाबाधित आढळले होते.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८५ कोटी ४ लाख ११ हजार ५६९ डोस लावण्यात आले आहेत. यातील १.९८ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील मुलांना लावण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८५ कोटी ७९ लाख ७६ हजार २५ डोस पैकी १५ कोटी ७० लाख ९० हजार ७१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७९ कोटी २० लाख २७ हजार ४१२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ८१ हजार ३७४ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?