पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नानंतर स्वतःच्या संसारात अडकून पडल्यावर आपली स्वप्नं, स्वप्नंच राहून जातात. लग्नानंतर बऱ्याचजणी चूल आणि मूल यातच अडकून राहतात. पण अशातही मार्ग काढून आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या प्रत्येकीची गोष्ट म्हणजे 'शाब्बास सुनबाई'. आपली स्वप्नं न विसरता त्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या आणि समोर येईल त्या आव्हानांना सामोरे जाणारी सनेची कथा कथन करणारी मालिका 'शाब्बास सुनबाई' तुम्हाला नक्कीच आवडेल.
जगाच्या स्पर्धेत नेहमी पहिलं येण्यासाठी वडिलांनी घडवलेल्या संजीवनीला तिच्या स्वप्नांसाठी खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागणार आहे तिच्या लग्नानंतर. ध्यानीमनी नसताना नाशिकच्या प्रतिष्ठित येवलेकर कुटुंबात लग्न झालेल्या संजीवनीसाठी सगळी चक्र लग्नानंतर फिरली. संजीवनीला नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे?
'शाब्बास सुनबाई' म्हणणाऱ्या अप्पा येवलेकरांचा संजीवनीला सून करण्यामागे नेमका काय हेतू आहे? अप्पासाहेब खरोखरच महिला सबलीकरणाचे खंदे पुरस्कर्ते आहेत की त्यांच्या रूपात संजीवनीच्या आयुष्यात एका खलनायकाचा प्रवेश होऊ लागलाय ? थोडक्यात, संजीवनीच्या स्वप्नांसाठी तिचं लग्न विघ्न ठरणार की प्रवाहाविरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार?
संजीवनीच्या भूमिकेत रश्मी अनपट तर अप्पांच्या भूमिकेत मयूर खांडगे दिसणार आहेत. या मालिकेचे लेखन शार्दुल सराफ व पूर्णानंद वांढेकर यांनी केलं आहे, तर दिनेश घोगळे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती सुचित्रा आदेश बांदेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.