पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अदाकारा रिचा चड्ढा (Richa Chadha) ने एक असं वादग्रस्त ट्विट केलं आहे, ज्यामुळे तिच्यावर भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. रिचा चड्ढाने जे ट्विट केलं आहे, ते एक प्रकारे भारतीय लष्कराचा (Indian Army) अपमानचं आहे. हे प्रकरण आहे तरी काय? पहा. (Richa Chadha)
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी म्हटलं होतं की, "भारतीय सैन्यदल पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्यास तयार, आदेशाची वाट पाहतोय, आदेश पूर्ण करण्यासाठी तयार आहे." यावर विधान करत रिचा चड्ढाने लिहिलं की, 'गलवान (Galwan) Hi म्हणत आहे.'
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हणाले होते- सरकार जो आदेश देईल त्याचं पालन केलं जाईल. आम्ही कोणतीही कारवाई करण्यास तयार आहोत. सरकार जसा आदेश देईल तसे आम्ही कृती करु. पाकिस्तानने शस्त्रबंदीचं उल्लंघन केलं तर आम्हीही सडेतोड उत्तर देऊ, असा सज्जड दमदेखील उपेंद्र द्विवेदी यांनी पाकला दिला होता.
भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्विट करत म्हटलं की, 'अपमानजनक ट्विट. हे ट्विट लवकर मागे घेतलं पाहिजे. आमच्या सशस्त्र दलाचे अपमान करणं योग्य नाही.' अनेक सोशल मीडिया युजर्सनी भारतीय लष्करावर टीका केल्याबद्दल रिचाला धारेवर धरले.
एका युजरने लिहिलं, 'गलवानमध्ये देशासाठी २० वीर सैनिकांनी प्राणाची बाजी लावली. पण, येथे एक अभिनेत्री भारतीय लष्कराची चेष्टा करत आहे.'
गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात २०२० मध्ये हिंसक झडप झाली होती. यामध्ये भारताचे २० शूर-वीर जवान शहीद झाले होते. चीनचे ३५-४० सैन्य ठार झाले होते. यानंतर भारत-चीन यांच्यात तणाव निर्माण झाला होता. १ मे, २०२० मध्ये उभय देशांमध्ये लडाखच्या पेंगोंग त्सो झीलच्या नॉर्थ बँकमध्ये संघर्ष झाला होता. चीनने आपल्या सैन्यांचा मृत्यूचा आकडा खूप दिवसांपर्यंत लपवला होता. पण, त्यानंतर त्यांचे पितळ उघडे पडले होते.
रिचाच्या या ट्विटनंतर ट्विटवर बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियावर युजर्स रिचावर टीका करत आहेत.