स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा;
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीनंतर आता मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. मराठवाड्यावरील अविकसितपणाचा कलंक आणि द्रारिद्य्रपणा कायमचा नाहीसा करण्यासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी, 25 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता उस्मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही परिषद होणार आहे.
संवाद परिषदेसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह मराठवाडामुक्ती मोर्चाचे अध्यक्ष जे. के. जाधव, संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी सक्रिय असलेले मराठवाडामुक्ती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे, डॉ. परमेश्वर गुट्टे, प्रदेश संघटक डॉ. भागवत नाईकवाडे, युवती प्रदेशाध्यक्षा अमृता चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याश्री सूर्यवंशी, प्रदेश महिला सचिव शकिला पठाण यांचीही उपस्थिती राहणार आहे.
मराठवाड्याला नेहमीच दुय्यम वागणूक मिळाली आहे. सुशिक्षित बेरोजगारांवर रोजगारासाठी मराठवाड्याबाहेर जायची वेळ आली. मराठवाड्याला सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी मराठवाडा स्वतंत्र राज्य होणे अत्यंत गरजेचे आहे, याच मागणीसाठी सातत्याने संघर्ष गतिमान केला जाणार आहे. त्याच दिशेने संवाद परिषदेमध्ये ध्येयधोरणदेखील ठरणार आहे, अशी माहिती मराठवाडामुक्ती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. रेवण भोसले यांनी दिली.
विकासासाठी समर्पक निधी दिला गेला नाही. यामुळे मराठवाड्याला अविकसितपणाचा कलंक लागला आहे. मराठवाड्यामध्ये मोठमोठे उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी मुबलक दळणवळण, रस्ते, पाणी, वीजपुरवठा, कुशल कामगारवर्ग, हवामान उपलब्ध असताना राज्यकर्त्यांनी दुजाभाव केला. – अॅड. रेवण भोसले, (सरचिटणीस, मराठवाडामुक्ती मोर्चा)