पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक मालिकेने अहिल्याबाई होळकर यांचे प्रेरणादायक चरित्र मांडले आहे. ही मालिका राणी अहिल्याबाई होळकर यांचे दिव्य जीवन चरित्र उलगडून दाखवते. आपल्या सुजाणतेने समाजात शांतता, समृद्धी आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणार्या, आपल्या काळाच्या खूप पुढे पाहणारी ही स्त्री होती, जिने हे सिद्ध करून दाखवले की, माणूस जन्माने नाही तर कर्तृत्वाने मोठा ठरत असतो. आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याने त्यांनी समाजातील काही अनिष्ट रूढींना आव्हान दिले आणि आपल्या प्रजेच्या हितासाठी सकारात्मक योगदान दिले. हे असे नाव होते, ज्यांनी फक्त इतिहास घडवला नाही, तर अनेक भावी पिढ्यांना प्रेरणा देखील दिली. सध्या ही मालिका अहिल्याबाईंच्या जीवनातील एक वैभवशाली प्रकरण 'मा से मातोश्री अध्याय' उलगडून दाखवत आहे. अहिल्याबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री एताशा संझगिरी मालिकेतील लीपनंतर मातेच्या भूमिकेत दिसत आहे.
२७ वर्षीय एतशा या मालिकेत, इतर अनेक जबाबदार्या सांभाळतानाच मालेराव आणि मुक्ता या दोन मुलांच्या प्रेमळ पण कडक आईची भूमिका करत आहे. अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेने एतशाला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. आता ती आईच्या भूमिकेत शिरली आहे.
आपला अनुभव सांगताना एताशा म्हणते, "मला हवे होते ते सर्व काही या मालिकेत आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षात एक कलाकार अशा भूमिकांच्या शोधात असतो, ज्यातून त्याचे अभिनय कौशल्य अधिक उजळून निघेल. मला जेव्हा अहिल्याबाईंची भूमिका देऊ करण्यात आली, तेव्हा मी थोडी घाबरले होते. कारण ही भूमिका करताना खूप मोठी जबाबदारी घ्यावी लागणार होती. 'आपल्या हातून काही चूक झाली तर?' अशी भीती मला वाटायची. कारण अहिल्याबाई एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, जिच्याकडे लोक आदराने पाहतात. आता मला मालिकेत दोन मुलांच्या आईची भूमिका करायची आहे, तर माझे कर्तव्य दुप्पट झाले आहे. मी त्यावर कसा विचार करते आणि या भूमिकेसाठी मनाची कशी तयारी करते यावर सगळे काही अवलंबून आहे. आईची भूमिका करताना मला अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत. मालिकेतील हा टप्पा आव्हानात्मक आहे, पण अहिल्याबाईंच्या जीवनयात्रेतील हा अध्याय मला मनापासून आवडला आहे आणि मला आशा आहे की, प्रेक्षक आणि माझे चाहते मला असेच प्रोत्साहन देत राहतील."