नवा गडी नवं राज्य : नव्या मालिकेच्या सेटवर साईशाची धमाल | पुढारी

नवा गडी नवं राज्य : नव्या मालिकेच्या सेटवर साईशाची धमाल

पुढारी आनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावर अनेक बालकलाकार आपण काम करताना पाहतो. त्यातले काही बालकलाकार हे नेहमीच लक्षात राहातात. सोशल मीडियातून घराघरात पोहचलेली छोटी साईशा भोईर, रंग माझा वेगळा या मालिकेत सर्वांची लाडकी झाली होती. साईशा आता नवा गडी नवं राज्य या मालिकेत दिसून येत आहे. या मालिकेतील साईशाची भूमिकाही सगळ्यांना आवडते आहे. साईशाही या नवीन सेटवर खूपच चांगल्या प्रकारे रुळली आहे.

छोट्या मुलांना एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर गेल्यावर मिसळून, त्यामुळे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागायला किंवा काम करायला त्यांना वेळ लागतो. मात्र, साईशाचं एकदम उलट आहे. साईशा कोणत्याही सेटवर जाते त्या सेटवर सर्वांमध्ये अगदी मिसळून जाते.
या आधी रंग माझा वेगळा या मालिकेत साईशाने काम केले होते. त्या सेटवर ती सगळ्यांची लाडकी होती. आणि आता या नवीन सेटवरही साईशा ने सगळ्यांशी गट्टी केली आहे. सेटवर प्रत्येकाशी आवर्जुन बोलणं, सगळ्यांसोबत गप्पा मारणं हे ती नेहमी करते. सेटवर अभिनत्री अनिता दातेबरोबर तिची खास मैत्री झालेली दिसून येत आहे. अनिताला साईशाने खास नावंही ठेवलं आहे. अनिता आणि साईशाचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांना आवडते आहे. ज्यात साईशा अनिताचा मेकअप करताना दिसत आहे.

अनिता दाते साईशाचं कौतुक करताना म्हणते,’’ साईशाची आणि माझी पहिल्याच दिवशी गट्टी जमली. साईशा स्वतःहून ओळख करुन घेते. लहान मुलं साधारणपणे नवीन लोकांशी मैत्री करायला घाबरतात, पण साईशाचं अजिबात तसं नाही आहे. आपल्याला कळत नाही की, हिच्याशी काय बोलायचं आता? पण, साईशा एवढा वेळंच देत नाही. ती सेटवर येते सगळ्यांना गुडमॉर्निंग म्हणते, जाताना सांगून जाते, त्यामुळे तिला माणसांमध्ये असायला आवडतं आणि हे फार छान आहे. तसंच कितीही वेळ शूट असले तरी कंटाळत नाही, खूप प्रोफेशनल करते. सतत काही ना काही क्रिएटीव्ह करत असते. सगळ्यांना भेटवस्तू देत असते. ती सेटवर नसली की आम्हाला करमत नाही.”

साईशा नवीन सेटबद्दल गप्पा मारताना सांगते. “मला या सेटवर खूप मज्जा येते. मला फनी ताई (अनिता ताईला आम्ही फनी ताई म्हणतो) खूप आवडते. सेटवर पहिल्या दिवशी पासूनच अनिता ताई माझ्याशी फार गंमतीशीर वागली म्हणून मी तिला फनी ताई म्हणते. त्याशिवाय कश्यप दादा, पल्लवी ताई सोबत माझी चांगली मैत्री झाली आहे. सेटवर माझे सगळेच लाड करतात. मलाही सगळ्यांशी बोलायला खूप आवडते. म्हणून मी कोणत्याही ठिकाणी जाते तिथे सगळ्यांशी मैत्री करते.”

छोटी साईशा आपल्या गोड बोलण्याने आणि वागण्याने सगळ्यांना आपलंसं करुन घेते. त्यामुळे ती सगळ्यांची आवडती बनली आहे.

Back to top button