फोन हा आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. संवाद साधण्यासाठी यापेक्षा अधिक चांगले माध्यम दुसरे नाही. पण फोन कितीही उपयोगाचा असला तरीसुद्धा दिवसभर फोनवर व्यस्त राहण्याची सवय आरोग्याशी निगडित अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण करू शकते.
फोनचा वापर करताना काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवल्या पाहिजेत; जेणेकरून या समस्यांपासून आपल्याला दूर राहाणे शक्य होऊ शकेल. गरजेपेक्षा जास्त वेळ फोनवर व्यस्त राहिल्यामुळे कोणते आजार होतात आणि त्यापासून दूर राहण्यासाठी कोणते उपाय करणे शक्य आहे, याबाबत जाणून घेऊ…
डोळ्यांच्या समस्या ः जवळचा स्मार्टफोन व्हॉटस्अॅप, फेसबुक आणि ट्विटर यांना एका सेकंदात जोडून देतो. परंतु हळूहळू सतत याच्या वापरामुळे द़ृष्टी कमी होऊ लागते हे आपणाला ठाऊक आहे का? दिवसभर फोनमध्ये फोटो किंवा मेसेज बघत राहिल्यामुळे द़ृष्टी कमी होत जाते. कारण फोनमधील अक्षरांचा फाँट साईज कमी असल्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो. यामुळे डोळ्यातून पाणी येणे, अस्पष्ट दिसणे, डोकेदुखी, डोळे लाल होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
उपाय ः हा त्रास होऊ नये म्हणून फोन वापरताना तो डोळ्यांपासून काही अंतरावर ठेवूनच वापरावा. सतत फोनकडे बघत राहण्यापेक्षा अधूनमधून ब्रेक घ्यावा. डोळे काही वेळ बंद करून घ्यावेत. तळहात एकमेकांवर घासून नंतर ते डोळ्यांवर ठेवावेत. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
गळा आणि पाठीतील वेदना ः मेसेजिंग आणि चॅटिंगची सवय काही वेळ आनंद देते पण सतत यामागे लागल्याने दीर्घकाळ वेदनासुद्धा होऊ शकतात. पाठीत वाकून चॅट केल्यामुळे, मेसेज केल्यामुळे आणि गाणी ऐकल्यामुळे गळा आणि पाठ यामध्ये वेदना सुरू होतात. मानेच्या वेदनेपासून याची सुरुवात होते आणि हळूहळू ही वेदना पाठीपर्यंत पोहोचते. बरेचदा लोक ड्रायव्हिंंग करताना मान एकाबाजूला वळवून फोनवर बोलत असतात. ही गोष्ट फारच धोकेदायक ठरू शकते.
उपाय ः असा त्रास होऊ नये म्हणून फोनवर बोलताना मान सरळ ठेवावी. व्यस्त असाल तर फोन करू नये आणि तो स्वीकारू देखील नये. म्हणजे एका वेळी एकच काम करता येईल. अन्यथा काम करताना फोनवर बोलण्याच्या नादात दुसरे मोठे नुकसान होऊ शकते. बोलणे खूपच आवश्यक असेल तर इअर फोनचा वापर करावा. यामुळे मान सरळ ठेवून बोलणे शक्य होऊ शकेल.
बोटांमध्ये वेदना होणे ः टचस्क्रिन फोन असो किंवा की-बोर्डचा फोन असो; दोन्हीमध्ये बोटांचा वापर करावा लागतो. यामुळे बोटांमध्ये वेदना निर्माण होऊ शकते. बोटांची त्वचा कडक होऊ शकते आणि अनेकदा त्वचेला खाजही सुटू शकते.
उपाय ः अधूनमधून बोटांचे व्यायाम करत राहावे आणि मेसेजिंग ऐवजी चॅटिंगचा पर्याय निवडावा.
निद्रानाशाची समस्या ः फोनच्या अधिक वापरामुळे सर्वांत जास्त परिणाम झोपेवर होतो. रात्री तासन्तास फोनवर बोलत राहिल्यामुळे, मेसेज, व्हॉटस्अॅप किंवा फेसबुकवर अॅक्टिव्ह राहिल्यामुळे झोपेवर परिणाम होतो. सतत ऑनलाईन राहण्याच्या अट्टाहासापायी अशा व्यक्ती झोप टाळतात. सहा ते आठ तासांची झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. फोनच्या अतिरिक्त वापरामुळे ही झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे चिडचिडेपणा, ताणतणाव, नैराश्य यासारख्या समस्या निर्माण होतात.
उपाय ः झोपताना फोनचा वापर टाळावा. फोन सायलेंट मोडवर ठेवावा किंवा स्विचऑफ करून ठेवावा.
फोबिया ः फोनच्या सतत वापरामुळे नोमोफोबिया नावाचा एक वेगळाच फोबिया होऊ शकतो. यामध्ये फोन आजूबाजूला नसल्यास त्याच्या रिंगटोनचा आणि मेसेज टोनचा आभास होत राहातो. फोन हरवल्यानंतर, घरी विसरल्यानंतर अस्वस्थता आणि ताणतणाव जाणवतो. तसेच पूर्ण लक्ष फोनकडेच लागून राहाते. याचा पारिणाम मेंदूवर पडतो. कमकुवत स्मरणशक्तीचेसुद्धा हे कारण बनू शकते.
उपाय ः असा त्रास होऊ नये म्हणून सर्वांत प्रथम स्वतःला समजून घेणे गरजेचे आहे. मेडिटेशन आणि श्वासासंबंधीचे व्यायाम याद्वारे बर्याच प्रमाणात नोमोफोबियावर नियंत्रण राखता येऊ शकते.
-डॉ. संजय गायकवाड