पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा होत असलेला प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी सर्व दूध संस्थांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन चांगले योगदान दयावे, असे आवाहन राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त एच.पी. तुम्मोड यांनी केले आहे. जनावरांच्या शंभर टक्के लसीकरणातून आपण यावर निश्चित मात करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयामार्फत पुणे विभागातील दूध संस्थांची ऑनलाईनद्वारे बुधवारी (दि.21) बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे. बैठकीस मल्टीस्टेट संघ, जिल्हा व तालुका सहकारी दूध उत्पादक संघ आणि खाजगी दूध संस्थांचे मिळून सुमारे 80 प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे यांनी सहभाग घेत विभागाकडून सुरु असलेले लसीकरण व उपाययोजनांची दूध संस्थांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. सर्व दूध उत्पादक शेतकर्यांनी आपल्या जवळच्या पशुसंवर्धन केंद्रात जाऊन जनावरांचे लसीकरण करुन घेण्याबाबतच्या सूचना केल्या. तसेच राज्यात सद्यस्थितीत गाय व बैलांचे मिळून 40 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण होऊन जनावरांमध्ये लम्पीबाबत सामुहिक प्रतिकार शक्ति निर्माण होईल, असे नमूद केले. पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रशांत मोहोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.