मुंबई, पुढारी ऑनलाईन : नवी मुंबईतील घनसोली येथील एका शाळेत १८ विद्यार्थी पॉझिटिव्ह ( Coronavirus update) आल्यानंतर शिक्षण विभाग सतर्क झाला असून शाळा बंद करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, काही शाळांमध्ये विद्यार्थी कोरोनाबाधित आढळत असल्याने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात येण्याची चिन्हे आहेत. राज्यात सर्वाधिक ओमायक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे.
जवळपास दीड वर्षानंतर सुरू झालेल्या शाळा कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्याने पुन्हा एकदा बंद होण्याची भीती आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तसे संकेत दिले आहेत. राज्यात ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचे चिंतेची बाब आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा शाळा बंद कराव्या लागतील असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले.
शाळा सुरू करण्याच्या नियमानुसार, शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार (Coronavirus update) शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवेल, जेथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे तेथे शाळा बंद होतील, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.
ज्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणे आढळत आहेत, त्या ठिकाणी तिथे स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभाग निर्णय घेत आहे. आम्ही याबाबत मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. जर ओमायक्रॉन कोरोना संसर्गाची संख्या वाढली तर आम्हाला शाळा बंद करण्याबाबतही विचार करावा लागू शकतो, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :