पुढारी ऑनलाईन: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना रश्मी ठाकरें यांना राज्याच्या मुख्यमंत्री करा असा सल्ला दिला होता. याच मुद्द्यावरुन महापौर पेडणेकर यांनी संताप व्यक्त केलाय. राजकारणात नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव चंद्रकांत पाटील टीका करताना का घेतात असा प्रश्न उपस्थित केला. तसेच कायम प्रकाशझोतात असणाऱ्या अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनवा असा खोचक सल्ला देखील दिला.
राज्यात आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या काही वेळ अगोदर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव घरी राहून काम करणारे मुख्यमंत्री ठाकरे अधिवेशनासाठी उपस्थित राहतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून कठोर शब्दात टीका केली. पाटील यांनी अशीच टीका मंगळवारी देखील केली होती. याच संदर्भात पत्रकारांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना, रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद जाईल अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलीय असा प्रश्न विचारला असता महापौरांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलं.
चंद्रकांत दादांची मला किव येते. ते राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत मी बोलणे योग्य ठरणार नाही. देशातील भाजप नेते सातत्याने स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. ही आपली शिकवण नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. ते सहन केले जाणार नाही. जर भाजपचे नेते असंच बोलणार असतील तर आम्ही पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.