कोची : मुस्लीम पुरुषाने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्यानंतर पहिल्या पत्नीपासून दूर राहणे आणि शरीरसुख नाकारणे हे वाईट वर्तणुकीचा भाग असल्याने घटस्फोटसाठी संयुक्तिक कारण ठरते, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे.
न्यायमूर्ती मोहंमद मुश्ताक आणि सोफी थॉमस यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. कुराणचा दाखला देत हा निर्णय देण्यात आला असून हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
पुरुषाने एकापेक्षा जास्त लग्न केली असतील तर त्याला सर्वच बायकांना समानतेची वागणूक दिली आहे, असे कुराणमध्येच म्हटलेले आहे, पण त्याकडे दुलर्क्ष केले जाते असा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे.
या खटल्यातील महिला ५० वर्षांची असून तिचे लग्न १९९१ला झाले आहे. या महिलेने स्थानिक कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटसाठी अर्ज केला होता. पण कौटुंबिक न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याने तिने उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
या केसमधील नवऱ्याचे वय ५१ असून त्याने २०१४पासून पहिल्या बायकोला भेटणे पूर्ण बंद केलेले आहे. नवऱ्याने दुसरा विवाह केल्याचे कोर्टात नकारलेले नाही.
Muslim Marriage Act 1939 मधील सेक्शन २मधील तरतुदीनुसार याचिकाकर्त्या महिलेने घटस्फोट मागितला होता. पुरुषांने पत्नींना समान वागणूक दिली पाहिजे, तसे नसेल तर महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, असे तरतुदीत म्हटलेले आहे.
न्यायमूर्तींनी निकाल देताना म्हटले आहे की, "आपण पत्नींना समानतेची वागणूक देतो की नाही हे सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी पतीवर येते. या केसमध्ये पती बायकोला भेटलेलाच नाही, त्यामुळे त्याने असामनतेची आणि अन्यायकारक वागणूक दिल्याचे स्पष्ट होते."