नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरातील विविध भागात पाच जण मृतावस्थेत आढळले आहेत. यानंतर त्याचा थंडीने बळी घेतला असेल? अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली जात आहे. गणेशपेठ, कपिलनगर व सोनेगाव परिसरात तीन व्यक्तींचा मृत्यू झालेल्याच्यात समावेश आहे.
नागपूर शहरात यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद मंगळवारी ( दि. २१) रोजी झाली. मंगळवारी पारा ७.६ अंशांपर्यंत खाली घसरला. सध्याची थंडी ही हाडे गोठविणारी असल्याचे जाणवत आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वामन अण्णाजी सावळे (वय ६५, रा. गणेशपेठ वस्ती) हे वृद्ध फूटपाथवर मृतावस्थेत आढळले. तर कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशोक सोनटक्के (वय ५३, रा. गंजीपेठ, ट्रकचालक) हे कामठी रोडवर ट्रकमध्ये मृतावस्थेत सापडले.
याशिवाय सोनेगाव परिसरात उदय भुते (वय ५४) हे मृतावस्थेत सापडले. याशिवाय सोनेगाव येथे ५० वर्षीय अनोळखी महिलेचा तर सदर येथीही ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देवून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले आहेत.
या घटनेतील तिघांचा मृत्यू हा थंडीने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. थंडीच्या लाटेचा प्रभाव मंगळवारीही विदर्भात तीव्रतेने जाणवला. काल राज्यात निचांकी तापमानाची नोंद झाल्याने नागपूरच्या तापमानात पुन्हा घट होऊन पारा या मोसमातील निचांकीवर गेला. तर पूर्व विदर्भात येणाऱ्या गडचिरोली येथे सर्वात कमी म्हणजेच ७.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली.
याशिवाय अमरावती (७.७ अंश सेल्सिअस), वर्धा (८.२ अंश सेल्सिअस) आणि गोंदिया (८.४ अंश सेल्सिअस) सह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात मोठी घट झाली. कमाल तापमानातही दिवसेंदिवस घसरण होत आहे. थंडीची तीव्र लाट आणखी चोवीस तास कायम राहणार आहे. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?