नागपूर; पुढारी ऑनलाईन : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बाळापूर मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे आमदार नितीन देशमुख हे राज्यात परतले आहेत. राज्यात परतताच त्यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार पत्रकारांसमोर कथन केला. देशमुख हे परवा रात्रीपासून नॉटरिचेबल होते. ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण सुरतमध्ये गेल्यानंतर पहाटेच्या सुमारास नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर आली होती. पण आता देशमुख राज्यात परतल्यानंतर त्यांच्याबाबतीत नेमकं काय घडलं होतं? याचा खुलासा झाला आहे.
माझ्या शरिरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे, मला अटॅक आला नव्हता. त्यांचा हेतू चुकीचा आहे. रुग्णालयात नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन दिले गेले, असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काल अकोल्यात नितीन देशमुख यांच्या पत्नीने पती २० जूनच्या रात्रीपासून आपले पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. त्यामुळे कोणताही संपर्क नाही. सकाळपर्यंत संपर्क झाला नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.
नितीन देशमुख यांच्यासह उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील देखील राज्यात परतले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सोमवारी डिनरच्या नावाखाली अनेक शिवसेना आमदारांना वेगवेगळ्या वाहनांतून सुरतला नेल्याचे समोर आले होते. यामध्ये उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचाही समावेश होता. मात्र कैलास पाटील गुजरात बॉर्डरवरून निसटण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, ठाणे ओलांडल्यानंतर वाहने काही थांबण्याचे नाव घेत नव्हती. त्यानंतर ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती. याचदरम्यान कैलास पाटील लघुशंकेचा बहाण्याने वाहनाबाहेर आले. यानंतर अंधारात कोणालाही दिसणार नाही अशारीतीने ते महाराष्ट्राच्या दिशेने पायी चालू लागले.
अंधार आणि पावसाच्या सरी झेलत कैलास पाटील यांनी आपला प्रवास सुरूच ठेवला. सुमारे चार किलोमीटर अंतर त्यांनी पार केले. यानंतर एका दुचाकीवरून लिफ्ट घेतली. गाव आल्यानंतर दुचाकीस्वार थांबला. त्यामुळे त्यांना पुन्हा पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र काही वेळानंतर त्यांनी एका ट्रकमधून लिफ्ट मिळाली आणि ते थेट दहिसरला पोहचले. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगला गाठला. त्यांना आता वर्षा बंगल्यावर सुरक्षितरीत्या ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे ही वाचा :