राजेंद्र पाटील-यड्रावकर एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी | पुढारी

राजेंद्र पाटील-यड्रावकर एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन : एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारले आहे त्यात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सहभाग आहे. ते कालपासून नॉटरिचेबल आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याची भूमिका घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे भुदरगड-राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी, मी शिवसेनेचाच आहे. कोणत्याही प्रश्नावर माझी नाराजी नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत. विधानपरिषदेचे मतदान झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह दहा आमदारांना जरा भेटायचे आहे, असे म्हणून फार्महाऊसवर नेले होते. तेव्हापासून आबिटकर यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे आबिटकरही शिंदे यांच्या बंडात सहभागी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
काल दिवसभर जिल्ह्यातील व मतदारसंघातील शिवसैनिक व समर्थक आ. आबिटकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते नॉटरिचेबल होते. दुपारनंतर त्यांच्याशी संपर्क झाला. विधानपरिषदेचे मतदान झाल्यानंतर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासह दहा आमदारांना फार्म हाऊसवर नेले. गुजरात सीमेवर गेल्यावर वेगळे काहीतरी घडत असल्याचे लक्षात आले.पहाटे अन्य कुणाच्या तरी फोनवरून आपण भाऊ प्रा. अर्जुन आबिटकर यांच्याशी संपर्क साधला. घडला प्रकार सांगून आपले मित्र व शिवसेना आमदार वैभव नाईक यांनाही घडलेले सर्व सांगा आणि आम्ही मुंबईला येत असल्याचा निरोप द्या, असे सांगितले. त्यानंतर प्रा. आबिटकर व त्यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले.

दरम्यान, मी नाराज नाही. मुंबईला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी अर्जुन आबिटकर यांच्याशी बोलताना स्पष्ट केले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button