प्रकाश आबिटकर सावध भूमिकेत | पुढारी

प्रकाश आबिटकर सावध भूमिकेत

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : बंड करायचे तर काही पदाचे लाभ मिळतील. मात्र, सध्याच्या मिळणार्‍या लाभांवर पाणी सोडायचे का? असा यक्ष प्रश्न शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना भेडसावत असावा. त्यामुळेच आपण शिवसेनेबरोबरच, अशी भूमिका त्यांनी जाहीर करून मतदारसंघातील आपल्या वर्चस्वाला कोणी आव्हान देऊ नये याची तयारी केली आहे. मात्र, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

जुळण्या आणि फेरजुळण्या

जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आगामी विधानसभा लक्षात घेऊन काही ठिकाणी नव्या राजकीय जुळण्या होण्याचे संकेत आहेत. तसेच सोयीच्या फेरजुळण्याही होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेला बंड नवे नाही. यापूर्वी झालेल्या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातील काही मंडळीही सहभागी झाली होती. आताही कोणी बंड केले तर त्याचे नावीन्य उरलेले नाही.

प्रकाश आबिटकर हे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. त्यांना तरुण चेहरा म्हणून सर्वात पहिली संधी देण्यात आली. सलग दोनवेळा त्यांनी विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर जिंकली आहे. मात्र, त्यांच्या विजयात राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांच्या विरोधकांचाही मोठा वाटा आहे.

राधानगरी आणि भुदरगड या दोन्ही तालुक्यांत के.पी. विरोधकांनी आबिटकर यांना मुक्त हस्ते मदत केली आहे. त्यामुळे त्यांचा विधानसभेतील मार्ग सुकर झाला, याची जाणीवही त्यांना आहे. त्यामुळेच बंडखोरांच्या यादीत नाव येताच त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. आपल्याला फार्महाऊसवर नेण्यात आले आणि गुजरातच्या बॉर्डरवर गेल्यानंतर काही तरी वेगळे घडते आहे हे लक्षात येताच त्यांनी आपल्या भावाला फोन करून आपण शिवसेनेबरोबर असल्याचे सेनेच्या नेत्यांना कळवा, असा निरोप दिला. त्यामुळे त्यांनी घेतलेली ही भूमिका आणि प्रत्यक्षात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आबिटकरांचे राजकारण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराजांवर

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांमध्ये आबिटकर आहेत. शिंदे यांच्या पुढच्या चालीमध्ये ते सहभागी होणार की, गुजरातेत त्यांच्यासमवेत राहून त्यांना विरोध करणार, हेही लवकरच स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे सारे राजकारण काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नाराज गटाभोवतीच फिरते आहे, हे लपून राहिलेले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराजांची मदत ही त्यांच्यासाठी निवडणूक जिंकण्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे भूमिका जाहीर करून आबिटकर यांनी सावध खेळी केली आहे.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महाडिक गट असा सामना झाला. या निवडणुकीत आबिटकर यांचे समर्थक अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे या दोघांना महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी संधी दिली आणि ते दोघे संचालक म्हणून गोकुळ दूध संघावर निवडून आले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होऊ शकली नाही. शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. या निवडणुकीत आबिटकर यांचे बंधू प्रा. अर्जुन आबिटकर हे चुरशीच्या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे व तत्कालीन संचालक अनिल पाटील या दोघांचा पराभव करून निवडून आले. या निवडणुकीतही त्यांना राष्ट्रवादी व काँग्रेसची छुपी मदत झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आता शिवसेनेच्या अर्थात महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्यास जिल्ह्यात ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेत आपले स्थान काय. त्याचबरोबर शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराज गटांची होणारी मदत शिंदे यांच्याबरोबर गेल्यास होणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेच आबिटकर यांनी घेतलेली भूमिका जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, अशीच भूमिका शिवसेनेच्या पाच माजी आमदारांनी घेतली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, ‘गोकुळ’चे संचालक डॉ. सुजित मिणचेकर हे गोवा दौर्‍यावर आहेत. राज्यात शिवसेनेत बंड झाले असताना शिवसेनेच्या या पाच माजी आमदारांचे भाजपशासित गोवा राज्यात दौर्‍यावर जाणे राजकारणात चर्चा घडविण्यास पुरेसे ठरले आहे. त्यांनीही आपण पूर्वनियोजित ठरल्यानुसार गोव्याला गेल्याचा खुलासा केला आहे.

Back to top button