बंड कोणत्याही पक्षाचे असो...मराठवाड्याचा सहभाग ठरलेलाच! | पुढारी

बंड कोणत्याही पक्षाचे असो...मराठवाड्याचा सहभाग ठरलेलाच!

उमेश काळे : बंड काँग्रेसचे असो, शिवसेनेचे अथवा भाजपचे. मराठवाड्यातील कार्यकर्ते, नेत्यांचा सहभाग त्यात ठरलेलाच. १९७५ पासून झालेल्या अनेक राजकीय बंडाचे केंद्र औरंगाबाद अथवा मराठवाडा प्रदेश राहिला आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात गेल्यानंतर वसंतराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले. वसंतराव हे विदर्भातील नेते त्याचवेळी 1974 च्या सुमारास विकास आंदोलन या भागात सुरू झाले. त्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठाची निर्मिती झाली. अन्य काही मागण्या या प्रलंबित राहिल्या.

परंतु सलग 13 वर्ष मुख्यमंत्रीपद वसंतराव नाईक यांच्याकडेच राहिल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी हळूहळू पसरण्यास प्रारंभ झाला आणि औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृह येथे मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव काळे आणि बाळासाहेब पवार यांनी मराठवाड्याला मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे अशी मागणी करत बंडाचा झेंडा उभारला. तेव्हा इंदिरा गांधी या पक्षाच्या सर्वेसर्वा होत्या. या मागणीवरून मोठा असंतोष पसरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. अर्थात आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांत काँग्रेसची झालेली शकले आणि जनता पक्षाच्या प्रभावामुळे चव्हाण यांना संधी मिळाली नाही.

वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण अवघ्या चार महिन्यांतच शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग करून सत्ता मिळविली. काँग्रेस पक्षातीलच सुधाकरराव नाईक यांनी औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहात तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करून हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. मला वाटते शरद पवार यांना पक्ष व मंत्रीपदावरून दूर केले पाहिजे असा बाॕम्बगोळा सुधाकरराव नाईक यांनी टाकला. त्याची पार्श्वभूमी होती ती मुंबईत झालेल्या हिंसाचाराची. हा हिंसाचार मोडून काढण्यासाठी शरद पवार हे मुंबईत दाखल झाले आणि प्रशासकीय यंत्रणेसमोर पवारांच्या ऐकायचे की नाईकांचे हा पेच उभा राहिला. त्यातच सुधाकरराव हे आपण सांगू ते ऐकतील हा पवारांचा अंदाज साफ चुकला आणि नाईक यांना शिवीगाळ, मारहाणीपर्यंत प्रकरण गेले.

मुंबईबाहेर शिवसेनेला औरंगाबाद महापालिकेत मोठे यश मिळाले. 1990 ला विधानसभा निवडणूक घोषित झाली आणि चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली त्यामुळे पक्षातील काही कार्यकर्ते नाराज झाले. सिडको भागातील नगरसेवक व आक्रमक नेते अशी ओळख असणारे मोतीराम घडमोडे त्यापैकी एक. त्यांनी उघडपणे खैरे यांना विरोध करीत पक्ष नेतृत्वावर टीका केली. साहजिकच त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडामध्ये बबनराव वाघचौरे (पैठण), कैलास पाटील (गंगापूर), हणुमंत बोबडे (परभणी) हे या भागातील आमदार सहभागी होते.

शिवसेना आणि काँग्रेस प्रमाणेच भाजपतही बंड झाले होते. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पक्ष नेतृत्व आपली उपेक्षा करीत असल्याचा आरोप करीत भाजप नेते यांनी पक्ष नेतृत्वावरील आपला राग व्यक्त केला तो प्रथम औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी थेट दिल्ली गाठत काँग्रेस प्रवेशाचा प्रयत्न केला. पण नंतर दिलेल्या एका मुलाखतीत मुंडे यांनी शरद पवार यांनी भाजप न सोडण्याचा सल्ला दिला, असे कबूल केले.

मनोहर जोशी सीएम झाल्यानंतर आपणास मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे मुंडे – महाजन यांचे मित्र जयसिंगराव गायकवाड यांना वाटत होते. ते न मिळाल्याने खुलताबाद विश्रामगृहात गायकवाड समर्थकांनी मुंडे यांच्यासमोर गोंधळ घातला. कालांतराने गायकवाड यांना सहकार राज्यमंत्री करण्यात आले. नंतर बीड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर ते मनुष्यबळ विकास राज्यमंत्री झाले. पण काही काळाने त्यांना अचानक वगळल्यानंतर गायकवाड यांनी राष्ट्रवादी गाठली आणि ते बीडमधून निवडूनही आले.

शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे औरंगाबादेत विलिनीकरण, शंकरराव चव्हाण यांनी मसकाँ हा नवा पक्ष काढून केलेला प्रयोग, 1991 ला शरद पवार मुखयमंत्री असताना विलासराव देशमुख यांचे फसलेले बंड, जनसंघाचे ज्येष्ठ नेते पुंडलिक हरी दानवे यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर बीडचे सुरेश नवले यांनी केलेला सेनेचा त्याग ही व अशी अन्य काही उदाहरणे चटकन नजरेत येणारी. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडातही या भागातील सहा आमदार आहेत. महिनाभरापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील काही भागाचा दौरा केला होता. तेव्हाच तर या बंडाची पेरणी झाली नसावी ना….

हेही वाचा  

Back to top button