पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले चार दिवसांपासून हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष पेटला आहे. अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेने या हल्ल्याचा निषेध करत, इस्रायला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हमास-इस्रायल संघर्षावर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. या संदर्भातील माहिती पीएम मोदी यांनी त्यांच्या अधिकृत 'X' सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत दिली आहे. (Pm Modi On Israel-Hamas War)
पीएम मोदी यांनी 'X' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे माझ्या फोनला प्रतिसाद देत इस्रायलमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीबद्दल माहिती दिल्याबद्दल आभार मानतो. इस्रायलच्या या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो, असेही पीएम मोदी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Pm Modi On Israel-Hamas War)
इस्रायल आणि हमासमध्ये सुरु झालेल्या भीषण युद्धाचा आज चौथा दिवस आहे. हमासने केलेल्या बॉम्ब हल्ल्याला इस्रायलने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत. यामध्ये आत्तापर्यंत १६०० हून अधिक इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील नागरिक, सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारांहून अधिकजण जखमी झाले आहे. दरम्यान हमास दहशतवाद्यांची आज पुन्हा १७०७ ठिकाणी रॉकेट डागले असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
इस्रायली टीव्ही चॅनेलने सांगितले की, हमासच्या दहशतवाद्यांच्या अभूतपूर्व हल्ल्यात सुमारे १६०० हून अधिक लोक मारले गेले. ज्यात २६० लोक वाळवंटातील संगीत महोत्सवात होते. तर गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये पॅलेस्टिनींच्या मृत्यूची संख्या ६८७ वर पोहचली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.