पुढारी ऑनलाईन डेस्क : बारसूमधील कातळशिल्पांना राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा, अशी मागणी होत आहेच. किंबहुना, कोकणातील अनेक कातळशिल्पांना जागतिक वारसा स्थान मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुळात बारसू (ता. राजापूर) हे कातळशिल्प राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहेच. सोबतच सिंधुदुर्गातील कुडोपी, रत्नागिरीतील उक्षी, जांभरुण, कशेळी, बारसू, देवाचे गोठणे, निवळी, चवे देऊड, रुंधेतळी, देवी हासोळ अशी कातळशिल्पे आजदेखील अस्तित्वात आहे. ही दगडात कोरलेली शिल्पे मानवी उत्क्रांतीची साक्ष देतात. मासे, जलचर सृष्टी, प्राणी, माणसे आणि अनेक रहस्य़मयी कातळशिल्पे जी कल्पना करण्याच्या पलिकडे आहेत. काही कातळशिल्पे जांभ्या दगडांमध्ये कोरली गेलेली आहेत. कोकणातील ही कातळशिल्पे जवळपास ४५ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जाते. वरील कातळशिल्पांपैकी आज देवाचे गोठणे आणि बारसू येथील कातळशिल्पांबद्दल जाणून घेणार आहोत. देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांना जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. येथे एक आश्चर्यजनक घटना घडते, ज्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात घेऊ शकता.
कोकणातील कातळशिल्पे प्रागैतिहासिक आणि मध्याश्मयुगीन मानवाने कोरलेल्या शिल्पाकृती असल्यामुळे या ठिकाणांना खूप महत्त्व आहे. बारसू आणि देवाचे गोठणे ही दोन्ही कातळशिल्पे मध्याश्मयुगीन काळातील आहेत. देवाचे गोठणे आणि बारसू ही दोन्ही ठिकाणे कुतुहल निर्माण करणारी आहेत. पैकी देवाचे गोठणे या ठिकाणी तुम्ही एकदा का होईना भेट द्यायलाचं हवी. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात १) बारसू आणि २) देवाचे गोठणे ही दोन गावे आहेत. या दोन्ही ठिकाणी कातळशिल्प आहेत. 'रहस्यमयी' देवाचे गोठणे कातळशिल्प विलक्षण अनुभव देणारे ठरेल.
बारसूची कातळशिल्पे कुतूहल निर्माण करणारी
बारसू हे गाव तसे छोटे पण नारळ, पोफळी, आंब्याच्या झाडांनी वेढलेले. काजूची अनेक मळे, हिरवागार निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नीरव शांतता अनुभवायला येते. कोल्हापूरपासून साडे तीन तासांचा प्रवास करत बारसूला पोहोचता येतं. जाताना बारसू नावाचे फलक दिसते. पण, त्या गावात न जाता, अलिकडेच डाव्या बाजूला कच्चा रस्ता गेला आहे. दोन किलोमीटर आतमध्ये हा रस्ता असून याठिकाणी चारचाकी आणि दुचाकीने कातळशिल्पांपर्यंत जाता येते. पण आजूबाजूला बऱ्याच किलोमीटर अंतरावर कोणत्याही सुविधा नसल्याने सोबतचं पाणी आणि खाऊ घेऊन जाणे सोयीचे ठरते.
बारसूच्या एका विस्तीर्ण पठारावर तीन ते चार ठिकाणी विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. जांभ्या दगडांवर प्राण्यांची चित्रे, वाघ, ससा, छोटे-मोठे मासे, मानवी आकृती, समुद्र असे अनेक शिल्पे आहेत. अशी काही शिल्पे आहेत, जी समजण्यापलिकडे आहेत. ही शिल्पे आकाराने मोठी आहेत. तर काही आकृत्या आकाराने छोट्या आहेत. त्यातील काही शिल्पांचा अर्थ किंवा त्या आकृत्या नेमक्या कशाचा आहेत? हे पटकन लक्षात येत नाहीत. कातळशिल्पांचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक, तज्ज्ञ, इतिहासकार यावर संशोधन करताना दिसतात.
कोल्हापूरपासून बारसूला जाण्यासाठी साडेतीन तासांचा कालावधी लागतो.
कोल्हापूर-गगनबावडा-अणुस्कुरा घाट-पाचाल रोड-रायपाटण-मुंबई गोवा हायवे-हार्डी ब्रीज-बारसू कातळशिल्प (petroglyphs of barsu)
अविस्मरणीय ठिकाण म्हणजे देवाचे गोठणे. हे एक छोटं खेडेगाव. मातीची कोकणी कौलारू घरं, मातीने, शेणाने सारवलेले विस्तीर्ण अंगण, समोर तुळस, हंबरडणारी गुरे, आंबा, काजू, फणस, सुपारी, कोकम, पळस, फुले, माडाची झाडे आणि त्यातून येणार चिवचिवाट असा निसर्ग इथे अनुभवायला येतो. या गावातून पठारावर जाणारी एक छोटी वाट आहे.
तुम्ही जाणार असाल तर गावातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलांना सोबत घेऊन या पठारावर जाऊ शकता. शक्यतो या लॅटेराईट पठारावर एकटे जाऊ नये. कारण भल्या मोठ्या पठारावर येथील कातळशिल्प शोधणे कठीण जाते.
गावातून पायवाट तुडवत अर्धा तासांच्या चढतीनंतर पठारावर पोहोचता येते. अंदाजे साडे सात ते ८ फूट माणसाची प्रतिमा येथे कोरलेली आहे. हे गूढ कातळशिल्पे पाहण्यासाठी हजारो पर्यटक, अभ्यासक याठिकाणी येतात. या मानवाच्या प्रतिमेवर विविध ठिकाणी होकायंत्र ठेवल्यानंतर उत्तर – दक्षिण अशी अशी दिशा स्थिर होत नाही. शिवाय होकायंत्र गोल गोल फिरत राहते. त्याचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिलेला आहे.
या खडक चुंबकीय विसंगती दर्शवतो. या मानवाच्या पूर्ण प्रतिमेवरचं हे होकायंत्र काम करत नाही. मुळात चुंबकसूची (सुई) पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर-दक्षिण दिशेने स्थिर होते. पण या प्रतिमेवर होकायंत्राची सुई कधी सुलट तर कधी उलट आपोआप गोल फिरत राहते.
या गूढ ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक, इतिहास तज्ज्ञ या ठिकाणी येत असतात. या मानवाची प्रतिमा असलेल्या कातळशिल्पावरचं होकायंत्र उत्तर-दक्षिण स्थिर होत नाही. पण, या आकृतीपासून होकायंत्र बाजूला नेताच पुन्हा होकायंत्राची सूई दिशा दर्शवते.
या मानवाच्या पायाजवळ तर होकायंत्राची सुई अजिबात दिशा दाखवत नाही.
देवाचे गोठणे हे बारसूपासून नजीक आहे. बारसूपासून अर्धा तासाचे अंतर कापल्यानंतर देवाचे गोठणे या ठिकाणी जाता येते. सोळगाव देवाचे गोठणेला जाताना डाव्या बाजूना फलक दिसतील. शिवाय सोळगाव देवाचे गोठणेच कमानदेखील दिसेल. तिथून आतमध्ये जाता येईल. शिवाय काही अंतर पार केल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला एक ब्रीज असून भार्गव राम मंदिर दिसेल, त्या ठिकाणी गाडी पार्क करता येईल.
कोकणातील भार्गव राम मंदिर पाहण्यासारखे असून मोठे आहेत. सभोवताली छोटी-छोटी मंदिरे आहेत. या कौलारू मंदिरात खूप शांतता आणि थंड वातावरण आहे.
देवाचे गोठणेला जाताना फाट्यावर एका हॉटेल आहे, जिथे तुम्हाला उत्तम प्रकारचे जेवण, चहा, कॉफी, थंड पेये, नाश्ता मिळू शकतो.
देवीहसोळ कातळशिल्पे, कशेळी, देवघळी बीच, कनकादित्य मंदिर, पूर्णगड (किल्ला), पावस देवस्थान.
विशेष म्हणजे अनेक परदेशी पर्यटक, अभ्यासक य़ाठिकाणाला भेट देतात. ती कातळशिल्पे कॅमेराबद्ध करतात. आपल्याला जर या ठिकाणांविषयी कुतुहल असेल तर एकदा या दोन्ही ठिकाणांना अवश्य भेट दिलीच पाहिजे!
Video- Amucha Maharashtra insta वरून साभार
हेदेखील वाचले का?