पुढारी ऑनलाईन डेस्क : रत्नागिरी जिल्ह्यातील 'अलकनंदा' आणि 'वरुणा' या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले 'संगमेश्वर' हे 'कसबा संगमेश्वर' म्हणून ओळखले जाते. Karneshwar Temple) त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातील कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. (Karneshwar Temple)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे तसे प्रसिद्ध ठिकाण. ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून १७ किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. ते परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई – गोवा महामार्गावर वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. छत्रपती संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे. अशा ठिकाणी कर्णेश्वराचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. हे महामार्गापासून थोडे आत असल्यामुळे सहजासहजी नजरेस पडत नाही.
संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास 'रामक्षेत्र' असेही म्हटले जाते. संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.
हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.
कर्णेश्वर या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिर आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.
संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि. मी. अंतरावर आहे. संगमेश्वर बस स्थानकापासून देवरुख १७ कि. मी. अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३० मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. 'कोल्हापूर'ला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होऊ शकतो तसेच संगमेश्वराहून रत्नागिरी, लांजा आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.