कोल्हापूर : शाळेतील पहिलं पाऊल…या शाळेतील ‘हा’ उपक्रम पाहून तुम्हीही म्हणाल व्वा…!

शाळेतील पहिलं पाऊल
शाळेतील पहिलं पाऊल

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले दोन वर्ष जागतिक महामारी कोरोनामूळे जून महिन्यात शाळा सुरु झाल्या नव्हत्या. आता कोरोनाचे सावट कमी होतेय. यंदा शाळा १५ जूनला सुरु झाल्या. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांच्यात आनंद, उत्सुकता होती. जल्लोषात आणि उत्साहात मुलांचा प्रवेशोत्सव झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथील केंद्र शाळेनेही आपल्या विद्यार्थ्यांचे स्वागत हटके केले आहे. हे स्वागत पाहून सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. पाहूया नक्की काय केले आहे या शाळेने. (शाळेतील पहिलं पाऊल)

शाळेतील पहिलं पाऊल
शाळेतील पहिलं पाऊल

जून म्हटलं की मुलांना शाळेचे वेध लागतात. शाळेसाठी नवा गणवेश, पाटी-पेन्सील, नवी पुस्तक-वह्या, आपले नवे मित्र-मैत्रिणी याबद्दलची उत्सुकता लागून राहिलेली असते. पण गेल्या दोन वर्षात कोरोनामूळे शाळा नेहमीप्रमाणे जून महिन्यात शाळा सुरु झाल्या नाहीत. पण आता या काही महिन्यात कोरोनाचे सावट कमी होत आहे. त्यामुळे शाळा यंदा १५ जून रोजी सुरु झाल्या. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांच्यात भितीसह उत्सुकता होती. ठिकठिकाणी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. असच हटके स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील पुंगाव केंद्र शाळेने केले आहे. 

शाळेतील पहिलं पाऊल

केंद्रशाळा पुंगाव येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अगदी उत्साहाने भरलेल्या वातावरणामध्ये झाला. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी फुगे, केळी नारळीचे पाने यांनी सजवलेला ट्रॅक्टर, शाळेतील इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येक पहिलीच्या विद्यार्थ्यांना क्रॉऊन (टोप) केले होते. प्रत्येक घरातून औक्षण करून आलेला विद्यार्थ्यांना जि.प.सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी पेढे व साखर वाटून स्वागत केले. विद्यार्थ्यांची झांज पथकाच्या ठेक्यातून अन् आकर्षक चालीमधून उपस्थित मान्यवरांच्या साथीने गावातून मिरवणूक काढण्यात आली.

विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाय टिपण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. त्याचा रंग सुद्धा पेपरवर कित्येक वर्ष रहावा म्हणून परमन्ट पॅड इंकची वापर केला होता. पाय उठवलेल्या कागदावर वर्गशिक्षक मुख्याध्यापकांच्या व केंद्रप्रमुख यांच्या सहीने प्रमाणित करण्यात आले. हा कागद जतन व्हावा यासाठी लॅमिनेटेड फोल्डरचा वापर केला.

या उपक्रमाबद्दल, शाळेचे  मुख्याध्यापक, शिक्षक वृंदासह ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत आहे. स्वागताचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फारच सुंदर, स्तुत्य उपक्रम, असेच चांगले उपक्रम सर्वत्र व्हावेत, शाळेची गोडी निर्माण करायची असेल तर असे प्रयोग शाळांनी नक्की करावेत, खरंच काय सुंदर कल्पना आहे..आमच्या वेळी हे असलं नव्हतं! अशा प्रतिक्रिया विविध स्तरातून येत आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news