

हडपसर, पुढारी वृत्तसेवा: हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात माजी नगरसेविका पूजा समीर कोद्रे यांच्या नावाचा फलक पालिका अधिकार्यांनी काढून टाकल्याच्या कारणावरून कोद्रे यांनी त्यांना दमबाजी करून कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी अधिकारी व कर्मचारी यांनी संतप्त भावना व्यक्त करत काम बंद आंदोलन केले आहे.
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयामधील माझ्या नावाचा बोर्ड का काढला ? याचा जाब विचारत पूजा कोद्रे यांनी गोंधळ घातला. बुधवारी मीटिंगसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्या आल्या होत्या. त्यांना प्रवेशद्वारावर त्यांचा असलेला नामफलक झाकून ठेवल्याचे दिसून आले, याचा राग त्यांना आला.
त्यामुळे त्या थेट दुसर्या मजल्यावर बसलेले उपअधीक्षक प्रदीप भुजबळ यांच्या टेबलाकडे जात 'माझ्या नावाचा बोर्ड का काढला', अशी विचारणा करत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भुजबळ यांनी तात्काळ बोर्ड लावून त्यांना फोटो पाठवला, मात्र त्या ऐकण्यास तयार नव्हत्या. 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगून तुझी नोकरी घालविते, तुला कोणाकडे तक्रार करायची ती कर.
' तु मला ओळखत नाही अशा अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या व शिवीगाळ करत कार्यालयीन कामकाजात अडथळा आणला.
हा संपूर्ण प्रकार 20 ते 30 मिनिटे चालू होता. त्यामुळे कार्यालयीन कामकाज वेळ ठप्प झाले होते. हा सर्व प्रकार कार्यालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक पाहात होते. याप्रकरणी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कर्मचार्यांनी व अधिकार्यांनी 'काम बंद आंदोलन' सुरू केले आहे, याबाबतची तक्रार त्यांनी महापालिका सहायक आयुक्तांकडे केली आहे.
गैरसमजातून पालिका अधिकारी यांच्याबरोबर वाद झाला. मात्र, मी जाणून-बुजून त्यांचा अवमान करणे हा हेतू नव्हता. याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
-पूजा कोद्रे, माजी नगरसेविका, पुणे मनपा.
पालिकेच्या कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी कर्मचारीवर्गाने काम बंद करून अधिकारीवर्गाने निषेध व्यक्त केला.
-प्रसाद काटकर, सहायक पालिका आयुक्त, हडपसर, पुणे मनपा.
हेही वाचा