पुढारी ऑनलाईन : देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे (Infosys) शेअर्स आज मंगळवारी १.५ टक्क्यांनी घसरले. आज बाजारात एकूणच आयटी क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. इन्फोसिसचा एका जागतिक कंपनीसोबत सामंजस्य करार (एमओयू) २२ डिसेंबर रोजी संपुष्टात आला. या पार्श्वभूमीवर आज २६ डिसेंबर रोजी इन्फोसिसचे शेअर्स एनएसई निफ्टीवर १.५० टक्क्यांनी घसरून १,५४२ रुपयांवर आले. २२ डिसेंबर रोजी इन्फोसिसचा शेअर १.७५ टक्क्यांनी वाढून १,५६१ रुपयांवर बंद झाला होता.
संबंधित बातम्या
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करणार्या एका अज्ञात जागतिक कंपनीसोबतचा १.५ अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसचे शेअर्स घसरले आहेत. दरम्यान, बीएसई सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर १.४१ टक्के घसरणीसह १,५४० रुपयांवर व्यवहार करत आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, २२ डिसेंबर रोजीच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, एका जागतिक कंपनीने Infosys सोबतचा सामंजस्य करार संपुष्टात आणला. इन्फोसिस आधुनिकीकरण आणि व्यवसाय ऑपरेशन्स सेवा, इन्फोसिस प्लॅटफॉर्म आणि एआय सोल्यूशन्सचा फायदा घेऊन डिजिटल सेवा प्रदान करणार होते. १५ वर्षांमध्ये एकूण क्लायंट टार्गेट खर्च १.५ अब्ज डॉलर इतका अंदाजित होता. इन्फोसिसने सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार असल्याची घोषणा सप्टेंबर २०२३ मध्ये केली होती. पण हा करार आता संपुष्टात आला आहे. जागतिक आर्थिक मंदीच्या वातावरणात इन्फोसिससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या सहा महिन्यांत इन्फोसिसचा शेअर्स सुमारे २२ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या ५ वर्षांत त्यात सुमारे १३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, इन्फोसिसने त्या जागतिक कंपनीचे नाव उघड केलेले नाही. तसेच इन्फोसिसने हा करार रद्द करण्यामागचे कारणही स्पष्ट केलेले नाही. इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलंजन राय यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. निलंजन राय हे ६ वर्षे इन्फोसिसचे सीएफओ होते.
या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत Infosys ने निव्वळ नफ्यात वार्षिक ३ टक्के वाढ नोंदवली होती. या तिमाहीत एकत्रित महसूल मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे ७ टक्क्यांनी वाढून ३८,९९४ कोटी रुपये होता.