AI चा फटका! Paytm ने १ हजार कर्मचार्‍यांना दिला नारळ | पुढारी

AI चा फटका! Paytm ने १ हजार कर्मचार्‍यांना दिला नारळ

पुढारी ऑनलाईन : ‍‍देशातील ‍‍डिजिटल पेमेंट फर्म पेटीएमची पेरेंट कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (One97 Communications Ltd) ने अनेक विभागांमधील किमान १ हजार कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे. कंपनीने कर्मचारी खर्चात कपातीचा एक भाग म्हणून ही नोकरकपात केली असल्याचे वृत्त आहे. (Paytm layoffs)

संबंधित बातम्या 

कंपनीतील नोकरकपातीच्या वृत्तांवर भाष्य करताना पेटीएमच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की ऑपरेशन्स आणि मार्केटिंग टीममधील कर्मचार्‍यांची संख्या कमी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमने ऑक्टोबरपासून नोकरकपातीची प्रक्रिया सुरू केली होती.

संबंधित बातम्या

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) समाविष्ट करून आणि “पुनरावृत्ती कार्ये आणि भूमिका” काढून टाकून ऑपरेशन्समध्ये परिवर्तन करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

पेटीएम प्रवक्त्याने म्हटले आहे की, “आम्ही आमच्या ऑपरेशन्समध्ये AI-चालित ऑटोमेशनसह कार्यक्षमतेत बदल करत आहोत. यामुळे काही नोकऱ्या आम्ही कमी केल्या आहोत. परिणामी ऑपरेशन्स आणि मार्केटिंगमधील आमच्या मनुष्यबळामध्ये थोडीशी घट झाली आहे.”

त्यांनी पुढे अधोरेखित केले आहे की कंपनी एआय-संचालित ऑटोमेशन वापरून कर्मचार्‍यांवरील खर्च १० ते १५ टक्के बचत करू शकेल. “आम्ही कर्मचार्‍यांच्या खर्चात १० ते १५ टक्के बचत करू शकू. कारण AI ने आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले आहे. याव्यतिरिक्त आम्ही सतत वर्षभर सुमार कामगिरी प्रकरणांचे मूल्यांकन करतो,” असेही कंपनीच्या प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे.

पेटीएमच्या पेरेंट कंपनीने येत्या वर्षात त्यांच्या मुख्य पेमेंट व्यवसायात १५ हजार मनुष्यबळ वाढवण्याची योजना आखली आहे. “पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये अव्वल स्थान आणि फायदेशीर व्यवसाय मॉडेल सिद्ध करण्यासह आम्ही भारतासाठी नवनवीन शोध सुरू ठेवू,” असे सांगत विमा आणि मालमत्ता यांसारख्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

पेटीएम मधील नोकरकपात ही काही नवीन घटना नाही. कारण एआय-संचालित तंत्रज्ञानाचा वापर करून खर्च कमी करण्यासाठी अनेक नवीन कंपन्यांनी उपाययोजना केल्या आहेत. चालू वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत वित्तीय कंपन्यांतील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमावल्या लागल्या आहेत.

Back to top button