Nifty ला प्रतीक्षा २२ हजारांची, ‘कोणते’ शेअर्स प्रगतिपथावर?, जाणून घ्या अधिक | पुढारी

Nifty ला प्रतीक्षा २२ हजारांची, 'कोणते' शेअर्स प्रगतिपथावर?, जाणून घ्या अधिक

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

भारतीय शेअर बाजाराची घोडदौड सुरूच आहे. 21500 पासून मार्केटमध्ये करेक्शन येईल; परंतु ते तात्पुरते असेल, असे मागच्याच लेखात म्हटले होते. 20 डिसेंबर रोजी बाजारात जोरदार विक्री झाली. निफ्टी 300, तर बँक निफ्टी 425 पॉईंट्सनी गडगडले. निफ्टीने 21593 चा उच्चांकही नोंदवला; परंतु त्यानंतरच्या दोन दिवसांत मार्केटने जणू आपली चूक सुधारून घेतली आणि आठवड्याअखेरीस निफ्टी आणि सेन्सेक्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले. निफ्टी बँक मात्र अर्धा टक्क्याने घसरला.

निफ्टी मिड कॅप इंडेक्सही आठवड्यात एक टक्क्याने घसरला. स्मॉल कॅप इंडेक्स अजून वाढत असला तरी त्याचा वेग मंदावला आहे. ऑटो आणि रिअ‍ॅल्टी इंडेक्स रेड झोनमध्ये बंद झाले. तर आयटी, सीपीएसई, मिडकॅप, स्मॉल कॅप शेअर्सची गती मंदवणे आणि एनर्जी, फार्मा, एफएमसीजी सेक्टर्सनी तेजी दाखवणे, या गोष्टी इथून पुढे बाजार काही काळ सावधपणे वाटचाल करेल, असे दाखवतात.

वरून वेव्हेरेजीसने (VBL) ह्या आठवड्यात एफएमसीजी इंडेक्सचा झेंडा फडकवला. या शेअरने गेल्या वर्षभरात अगोदरच 77% रिटर्नस् दिले आहेत. आता या कंपनीने दक्षिण आफ्रिकेतील The Beverage Co (Bevco) या कंपनीचे अधिग्रहण करून दक्षिण आफ्रिकेतील पेप्सिकोचे Franchise rights आणि नामिबिया, बोटस्वाना या देशांतील डिस्ट्रीब्यूशन राईट्स प्राप्त केले. बुधवारी हा शेअर 18 टक्के वाढला आणि त्याने 1380 चा उच्चांक नोंदवला. लवकरच हा शेअर 2000 पार करेल. ब्रिटानिया (रु.5161.10) हिंदुस्थान युनिलिव्हर (रु. 2575.60) गोदरेज कंझ्युमर (रु. 1774.25) हे सर्व शेअर्स आस्ते कदम तेजी दाखवत आहेत. टाटा कंझ्युमरने एक हजाराचा टप्पा ओलांडून 1010 चा उच्चांक नोंदवला. नेस्लेने पंचवीस हजारांचा टप्पा ओलांडून 25778 चा उच्चांक नोंदवला.

सरकारी कंपन्या या आठवड्यात प्रकाश झोतात राहिल्या. भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) एनटीपीसी, ओएनजीसी हे शेअर्स प्रगतिपथावर आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स वर्षभरातील उच्चांकाच्या जवळ आहे. ओएनजीसीने 200 चा, तर एनटीपीसीने 300 चा टप्पा पार केला. हिंदू कॉपर आठवड्याचा सुपरस्टार ठरला. 22 टक्के वाढून त्याने रु. 232 चा उच्चांक नोंदवला.

रिअ‍ॅल्टी इंडेक्स आठवड्यात निगेटिव्ह झोनमध्ये राहिला तरी DLF ने मात्र पॉझिटिव्ह बे्रक आऊट दिला आहे. रु. 718.70 चा वर्षभरातील उच्चांक त्याने नोंदवला आहे. आगामी वर्षात तो 1000 पर्यंत जाईल. परकीय गुंतवणूक संस्थांची (FII) खरेदीची घोडदौड या आठड्यात एकूण 5622.20 कोटींची विक्री केली.

DIIS नी मात्र 9094 कोटी रुपयांची भरघोस खरेदी केली. बॅलन्स शीट्समध्ये नफा-तोटा दर्शवण्यासाठी FIIS कडून डिसेंबर महिन्यात Sell-off होणे हे खरे म्हणजे सर्वसाधारण दरवर्षीची घटना आहे. जानेवारीपासून त्यांचा भारतीय बाजारात पुन्हा ओघ सुरू होईल, कारण अमेरिकेतील बाँडयील्डस् चार टक्क्यांच्याही खाली गेले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत महागाई वाढण्याचा अंदाज गव्हर्नरची व्यक्त केला. ती वाढली तरी आवाक्याबाहेर जाणार नाही. व्याजदर कमी होतील किंवा स्थिर राहतील.

Consumption मध्ये विशेषतः Rural Consumption मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे डिमांड वाढेल. जगातील Geo-Poitical tensions कमी होण्याची शक्यता आहे. चीनमधील Slow down भारताच्या पथ्यावर पडेल, हे नक्की आता लवकरच ऑक्टोबर-डिसेंबर या 2023 च्या तिसर्‍या तिमाहीचे कंपन्यांचे आर्थिक निकाल जानेवारी 2024 पासून येण्यास सुरुवात होईल. वाढत्या आर्थिक साक्षरतेमुळे लोकांचा विशेषतः ग्रामीण जनतेचा Financial Services Sector Banking यांमधील सहभाग वाढेल. म्युच्युअल फंड्समधील देदीप्यमान वाढ अखंड चालू राहील.

निफ्टी 25000 चा टप्पा गाठण्यासाठी तयार आहे, त्याची कारणे वरीलप्रमाणे आहेत. फेब्रुवारीमधील देशांचे अंदाजपत्रक, सन 2023-24 चे कंपन्यांचे वार्षिक आर्थिक निकाल आणि लवकरच होणार्‍या लोकसभा निवडणुकांचे निकाल, या तीन महत्त्वाच्या बाबी निफ्टीच्या प्रवासाचा वेग निर्धारित करतील.

Back to top button