पुण्यात ३ वर्षांत ३४ पोलिसांवर बलात्कार, विनयभंग, खंडणी, हुंडाबळी, लाचखोरीचे गुन्हे

पुण्यात ३ वर्षांत ३४ पोलिसांवर बलात्कार, विनयभंग, खंडणी, हुंडाबळी, लाचखोरीचे गुन्हे

पुणे : अशोक मोराळे

सद्रक्षणाय… खलनिग्रहणाय.. अर्थात सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश, अशी शपथ घेऊन पोलिस दलात भरती होणार्‍या काही पोलिसांनी या दलाची मान शरमेने खाली जावी असेच काम केले आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 34 पोलिसांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये बहुतांश शहर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी असून बलात्कार, खंडणी, लाचखोरी, विनयभंग, धमकी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश असल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे.

शिस्त आणि कायद्याचे रक्षणकर्ते म्हणून सर्वत्र ख्याती असलेले पोलिस दल गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी कृत्य, लाचखोरी व बेशिस्त वर्तनामुळे बदनाम होत आहे. पूर्ववैमनस्यातून शहर पोलिस दलातील एका कर्मचार्‍याने दुसर्‍या कर्मचार्‍याच्या खुनाची सराईत गुन्हेगाराला सुपारी दिल्याचे प्रकरण असो की 50 लाखांच्या खंडणी प्रकरणातील मुख्यालयातील कर्मचार्‍याची अटक किंवा पोलिस अधिकार्‍याने महिला पोलिस अधिकार्‍यावर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक कृत्य करून केलेला खुनाचा प्रयत्न, या गंभीर घटना आहेत.

लाचखोरीचे ग्रहण सुटेना!

दिवसेंदिवस पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण वाढते आहे. महसूल खात्यानंतर लाचखोरीत पोलिस खात्याचाच बहुधा क्रमांक लागत असावा. तीन वर्षांत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दाखल झालेल्या 34 गुन्ह्यांमध्ये 12 लाचखोरीचे गुन्हे आहेत. आर्थिक प्रलोभनाला बळी पडून पोलिस लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकत आहेत.

पोलिसांना पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ

पोलिस दलातील काही कर्मचारी व अधिकार्‍यांनी आपल्या अधिकाराचा गैरफायदा उचलत अशा काही गोष्टी
केल्या, ज्यातून पोलिसांना पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली. पोलिसांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात 63 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सद्य परिस्थितीला हे सर्व गुन्हे कोर्टात प्रलंबित आहेत. पोलिसाने कायदा मोडणे आणि सर्वसामान्य नागरिकांनी कायद्याची चौकट ओलांडणे, यात मोठा फरक आहे. पोलिसांची समाजात एक वेगळीच ओळख आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नागरिक पोलिसांकडे नेहमीच वेगळ्या नजरेतून पाहत असतात. त्यामुळे कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच गुन्हेगारी कृत्य करीत असतील, तर त्याचा गांभीर्याने वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे.

घटना क्रमांक एक

50 लाखांच्या खंडणीचे प्रकरण
व्याजाने घेतलेल्या पैशासाठी एकाचे अपहरण करून शिरूरवरून पुण्यात आणून डांबून ठेवत 50 लाखांची खंडणी किंवा 5 एकर जमीन कागदोपत्री नावावर करून मागणार्‍या सहा जणांना खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुणे शहर पोलिस दलातील एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. संबंधित पोलिस शिपाई हा शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत आहे. तो संशयित आरोपींचा मित्र असून, त्याच्या सांगण्यावरून त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार घडल्याने त्याला अटक करण्यात आली होती.

घटना क्रमांक दोन

पोलिसाच्या खुनाची पोलिसाकडून सुपारी
फरासखाना पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने दत्तवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याला मारण्यासाठी सराईत गुन्हेगाराला सुपारी दिल्याची घटना नववर्षाच्या प्रारंभीच घडली. दत्तवाडी पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वेळीच घटनेला वाचा फुटली. त्यामुळे अनर्थ टळला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी योगेश प्रल्हाद अडसूळ (वय 35, रा. काळेपडळ, एकता कॉलनी, हडपसर) या सराईत गुन्हेगाराला अटक करून आरोपी पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराला ही सुपारी देण्यात आली होती. दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांत पूर्वी भांडणे झाली होती. त्यातून हा प्रकार घडला.

घटना क्रमांक तीन

महिला वकिलावर लैंगिक अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिस कॉन्स्टेबलने महिला वकिलाशी शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. मॅट्रिमोनिअल साइटवर दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी संबंधित पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याबाबत 29 वर्षांच्या महिला वकिलाने फिर्याद दिली आहे.

घटना क्रमांक चार

डॉक्टरचे अपहरण; दहा लाखांची खंडणी
दहा लाखांच्या खंडणीसाठी मारहाण करून डॉक्टरचे अपहरण केल्याची घटना जानेवारी 2020 मध्ये भेकराईनगर हडपसर येथील हरपळे क्लिनिकमध्ये घडली होती. गर्भलिंग निदान चाचणी केली नसतानाही ती केल्याचे धमकावत ब्लॅकमेलिंग करण्यात आले होते. आरोपींमध्ये एक स्वयंघोषित पत्रकार आणि पोलिस कर्मचार्‍याचा समावेश आहे. पोलिस कर्मचार्‍यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित पोलिस कर्मचारी तो मोठा अधिकारी असल्याचे सांगून टोळीत तोडपाणी करण्याचे काम करीत होता. पुढे या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. खंडणीविरोधी पथकाने केलेली कारवाई त्या वेळी चांगलीच गाजली होती.

घटना क्रमांक पाच

उपनिरीक्षकाकडून तरुणीवर बलात्कार
विवाहित असताना देखील लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वाहतूक विभागातील एका पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. याबाबत 25 वर्षीय तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी उपनिरीक्षक कोथरूड पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांची फिर्यादी तरुणीसोबत 2018 मध्ये ओळख झाली होती.

घटना क्रमांक सहा

पोलिस अधिकार्‍याची दारू पार्टी अन्…
रेमडेसिवीरचा काळाबाजार करून जादा दराने विक्री प्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाइकांसोबत गुन्हे शाखेतील एका पोलिस उपनिरीक्षकाने दारू पार्टी केली. पार्टीत मद्य प्राशन केल्यानंतर त्या पोलिस उपनिरीक्षकाने लहान मुलीची
छेड काढली. त्यानंतर सर्वांना आरोपी करण्याची धमकी दिली. याबाबत मुलीच्या घरच्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांनी तत्काळ संबंधित पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित केले.

घटना क्रमांक सात

अनैसर्गिक अत्याचार; गोळी झाडून खुनाचा प्रयत्न
विवाहबाह्य संबंधातून शहर पोलिस दलातील एका सहायक पोलिस निरीक्षकाने पोलिस उपनिरीक्षक महिलेवर गोळी झाडून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून त्याने हे कृत्य केले होते. याप्रकरणी एका सहायक पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पोलिस उपनिरीक्षक महिलेने फिर्याद दिली आहे. सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news