आडगाव रंजे, पुढारी वृत्तसेवा : जिलेटिनच्या तब्बल ३२१ कांड्या आणि ५०० डिटोनेटर जप्त करण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा शिवारात हट्टा पोलिसांनी छापा टाकून सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. एका शेतात स्फोटक पदार्थ असल्याची गोपनीय माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती.
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक एस. एस. तावडे, जमादार भुजंग कोकरे, जीवन गवारी यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी एकनाथ राठोड यांच्या शिरला तांडा शिवारातील आखाड्यावर छापा टाकला.
यावेळी आखाड्याची तपासणी केली असता एका कोपऱ्यामध्ये जिलेटिनच्या काड्याचा बॉक्स व डिटोनेटरचा बॉक्स लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी दोन्ही बॉक्स काढून पाहणी केली असता त्यामध्ये ३२१ जिलेटिनच्या कांड्या व ५०० डिटोनेटर आढळून आले. पोलिसांनी दोन्ही बॉक्स जप्त करून एकनाथ राठोड याच्याविरुद्ध स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विहिरीच्या खोदकामासाठी जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर आणण्यात आले होते. मात्र, शिल्लक राहिलेल्या कांडया व डिटोनेटर योग्य पद्धतीने हाताळणी करून त्याचा साठा करणे आवश्यक होते. मात्र, शिल्लक राहिलेल्या कांड्या शेतातील आखाड्यावर निष्काळजीपणाने ठेवण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे अधिक तपास करत आहेत.
हेही वाचलंत का ?