नाशिक : बैलगाडा शर्यतीवेळी आ. सरोज अहिरे यांच्या 'एण्ट्रीची' एकच चर्चा | पुढारी

नाशिक : बैलगाडा शर्यतीवेळी आ. सरोज अहिरे यांच्या 'एण्ट्रीची' एकच चर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
आडगाव-पिंपरी रस्त्यावरील विंचूर गवळी येथे सोमवारी (दि. 28) राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीप्रसंगी आमदार सरोज आहिरे यांनी हजेरी लावली. त्यांनी नऊवारी साडी आणि फेटा घालून शर्यतस्थळी पारंपरिक वेशभूषेत आगमन केले. आमदारांच्या या मराठमोळ्या पेहरावाचे स्वागत उपस्थितांनी केले. तर आमदार नीलेश लंके यांनी मनोगतात आमदार अहिरे यांना झाशीच्या राणीची उपमा देत कौतुक केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नीलेश लंके, माजी खासदार देवीदास पिंगळे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, विद्यार्थी अध्यक्ष सोमनाथ बोराडे, तुषार खांडबहाले, माजी जि. प. सदस्य यशवंत ढिकले, भाऊसाहेब ढिकले, गणेश गायधनी, संदेश टिळे, शीतल भोर, सरपंच मधुकर ढिकले, सरपंच अनिता रिकामे आदी मान्यवर उपस्थित होते.

शर्यतीत 150 पेक्षा जास्त बैलगाडामालक सहभागी झाले होते, तर एकूण 103 शर्यती पार पडल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाडामालकांना आर्थिक स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली. मुख्य शर्यतीला 7 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानाचे नारळ देत सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगतातून आमदार सरोज अहिरे यांनी सांगितले की, नाशिक तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. या शर्यती आयोजनामागे नाशिकच्या शेतकरी बांधवांना आनंद देण्याचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कहांडळ यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button